
पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे आजचे मरण उद्यावर गेले आहे. कारण त्यांच्या विरोधातील देशद्रोहाच्या खटल्यावरील निकाल देण्यास येथील उच्च न्यायालयाने बुधवारी विशेष न्यायालयाला रोखले. या खटल्यात मुशर्रफ यांना मृत्यूदंड दिला जाण्याची शक्यता आहे. 3 नोव्हेंबर 2007 रोजी आणीबाणी घोषित करणाऱया राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांच्याविरोधातील याचिकेवरील सुनावणी विशेष न्यायालयाने 19 नोव्हेंबरला पूर्ण केली.
आता त्यावर निकाल देण्याची वेळ आलेली असतानाच इस्लामाबाद उच्च न्यायालयाने हा निकाल देण्यास विशेष न्यायालयाला रोखले. इम्रान खान सरकारने मुशर्रफ यांच्यावरील हा निकाल रोखण्याबाबत याचिका दाखल केली होती. मुशर्रफ यांच्यावरील देशद्रोहाचा हा खटला नवाज शरीफ यांच्या ‘पीएमएल-एन’ सरकारच्या काळात म्हणजे डिसेंबर 2013 मध्ये सुरू झाला आहे. सरकारी पक्षाने मुशर्रफ यांच्यावरील सर्व पुरावे विशेष न्यायालयात सादर केले होते. ही सुनावणी आता पूर्ण झाली असून दुबईत राहणाऱया मुशर्रफ यांच्या विरोधात निकाल लागायची वेळ आली होती.




























































