जमीन खरेदी-विक्री प्रकरणी फसवणुक चौघांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । खेड

चुकीच्या पद्धतीने जागेची मोजणी करुन परस्पर जागेची विक्री करण्याला मदत करणाऱ्या भुमीअभिलेख कार्यालयाचे तत्कालीन अधिकारी, कर्मचारी यांच्यासह जागेची खरेदी विक्री करणाऱ्या चौघांच्या विरोधात खेड पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन खरेदी विक्री प्रकरणात भुमी अभिलेख कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचारीही सहआरोपी करण्यात आले असल्याने भुमीअभिलेख कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील संतोष सोमण यांची खेड तालुक्यातील मौजे धामणंद येथे वडिलोपार्जित जमीन आणि रहाते घर आहे. या ठिकाणी सर्व्हे क्रमांक ३०५/अ/१ ही सामाईक जमीन असून यामध्ये संतोष सोमण, विनायक शंकर सोमण अशा ९ जणांची मालकी आहे. याचा मिळकतीला लागूनच गजानन यशवंत पालांडे यांच्यासह सहाजणांची ३०५/३+४ ही मिळकत आहे.

पालांडे यांच्या मालकीची असलेली जमीन त्यांनी कुरवळ खेड येथील राजेंद्र लाड यांना २२/८२०१६ रोजी १ लाख ५० हजार रुपयांना खरेदी खताने विकली. हा व्यवहार करताना जागेची मोजणी करण्यात आली तेव्हा लगतचा कब्जेदार म्हणून भुमीअभिलेख खात्याने तक्रारदार सोमण यांना नोटीस बजावणे आवश्यक हेते. मात्र तशी कोणतीही नोटीस न बजावता भुमीअभिलेख खात्याच्या तत्काळीन अधिकाऱ्यानी जागेची मोजणी करुन खरेदी खतासाठी आवश्यक असलेले हद्द नकाशे ही पालांडे यांना दिले.

जागेची खरेदी झाल्यावर जागा खरेदी करणारे लाड यांनी त्या जागेचतील आईन आणि सागाची झाडे तोडली. त्याचप्रमाणे जेसीबी लावून जागेचे सपाटीकरणही केले. पालांडे यांनी लाड यांना विकलेल्या जागेत आपल्या मालकीची जागेच्या समावेश असल्याची सोमण यांना खात्री असल्याने त्यांनी त्या जागेची फेरमोजणी व्हावी यासाठी २५.४.२०१८ रोजी भुमिअभिलेख खेड यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जानुसार पालांडे यांनी लाड यांना विकलेल्या जागेची फेरमोजणी केली असता लाड यांना विकण्यात आलेल्या जागेत सोमण यांची जागा असल्याचे निष्पण्ण झाले.

सोमण यांनी या बाबत खेड पोलिसात रितसर तक्रार दाखल केल्यावर सादर केलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने खेड पोलिसांनी जागा विकणारे यशवंत पालांडे, जागा खरेदी करणारे राजेंद्र लाड, या कामी या दोघांना मदत करणारे विनायक सोमण, राजू पवार व भुमीअभिलेख खात्याचे तत्काळीन अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

या प्रकरणात भुमिअभिलेख खात्याच्या कोणते अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत ती नावे अद्याप उघड झाली नसली तर येत्या दोन दिवसात ती नावे उघड होतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.