भारतरत्न लता मंगेशकर यांचे महानिर्वाण;श्रीकृष्णाची बासरी लुप्त झाली,स्वरस्वती इंद्रलोकी परतली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सात पिढय़ांचं जीवन ज्या अद्भुत आणि जादुई स्वराने समृद्ध केलं तो लता मंगेशकर नामक दैवी स्वर जिथून आला होता तिथेच आज परत गेला… स्वरस्वती इंद्रलोकी परतली. अवघी पृथ्वी पोरकी झाली. भारतरत्न, महाराष्ट्र भूषण, स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

ऐंशीहून अधिक वर्षे सुरू असलेला स्वरप्रवास लौकिक अर्थानं थांबला. श्रीकृष्णाची बासरी लुप्त झाली. हिंदुस्थानातील घराघरांत ‘घरचं कुणीतरी’ गेलं असा हुंदका दाटून आला. लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले तेव्हाच अवघ्या देशाच्या काळजाचा ठोका चुकला होता… तेव्हापासून सुरू असलेल्या प्रार्थना देवाने ऐकल्या नाहीत. त्याने या स्वरमाऊलीला स्वर्गी पाचारण केले. देश शोकसागरात बुडाला. राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात आला. सायंकाळी एकीकडे सूर्य अस्ताला जात असताना, शिवाजी पार्क मैदानात युगान्त होत होता. लतादीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्ससंस्कार करण्यात आले. दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क मैदानात अलोट गर्दी उसळली होती… स्वरलता अनंतात विलीन झाली आपला स्वर्गीय स्वर रसिकांसाठी मागे ठेऊन!

‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर रविवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिन्ही सैन्य दलांच्या जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून लतादीदींना मानवंदना दिली.

 राज्यात आज सार्वजनिक सुट्टी 

‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल राज्य सरकारने शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. उद्या, सोमवार 7 फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून सरकारी कार्यालये, राज्यातील शाळा आणि महाविद्यालयेदेखील बंद राहणार आहेत. 

 हे दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही

लतादीदींच्या जाण्याचे दुःख मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. दयाळू आणि काळजी घेणाऱया लतादीदी आपल्याला सोडून गेल्या. त्यामुळे एक पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी कधीही भरून येणारी नाही. नवीन पिढी त्यांना हिंदुस्थानी संस्कृतीच्या एक दिग्गज म्हणून लक्षात ठेवील. त्यांच्या सुरेल आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची क्षमता होती. माझ्यासारखी त्यांना ओळखणारी अनेक माणसे सांगतील की, आमचे लतादीदींशी जवळचे नाते होते. तुम्ही जिकडे जाल तिकडे त्यांच्यावर प्रेम करणारी माणसे तुम्हाला भेटतील. स्वरांच्या माध्यमातून त्या आपल्यात कायम राहतील. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

स्वरयुगाचा अंत झाला, मातृतुल्य आशीर्वाद हरपला

लतादीदींच्या जाण्यानं एका स्वरयुगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला आहे. स्वरसम्राज्ञी लतादीदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे, पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादी आनंदघन म्हणून त्या स्वरअंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील. लतादीदी आज आपल्यात नाहीयेत, हे सुन्न करणारं आहे, पण  स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील. लतादीदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबीयांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं?
– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री