बांगलादेशात महिला पत्रकाराला मारहाण
बांगलादेशातील परिस्थिती अद्याप रुळावर आली नाही. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. ढाका येथे एका महिला पत्रकाराला जमावाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी मीडियाच्या कार्यालयावर हॉकी स्टिक आणि लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवला. यावेळी हल्लेखोरांनी एका महिलेला मारहाण केली. यात ती जखमी झाली. बांगलादेशात आतापर्यंत 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
ट्रम्प सरकार आल्यास मस्क कॅबिनेट मंत्री
अमेरिकेत सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. अमेरिकेत ट्रम्प सरकार आल्यास एलन मस्क यांना कॅबिनेट मंत्री बनवले जाईल, डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प यांना यासंबंधी विचारल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. एलन मस्क हे अत्यंत हुशार आहेत. जर ते कॅबिनेटमध्ये येणार असतील तर मला नक्कीच आनंद होईल, यासाठी ही नक्कीच प्रयत्न करेन, असेही ट्रम्प या वेळी म्हणाले.
शेअर बाजार उसळला, गुंतवणूकदारांची चांदी
शेअर बाजार मंगळवारी चांगलाच वधारला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 378 अंकांनी वधारून 80,802 अंकांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 126 अंकांनी वाढून 24,698 अंकांवर बंद झाला. बीएसईमधील लिस्टेड कंपन्यांचे एपूण मार्पेट कॅपिटलायझेशन वाढून 456.57 लाख कोटींवर पोहोचले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांनी 2.18 लाख कोटी रुपयांची कमाई केली.
महिन्याभरात 1.3 कोटी लोकांचा विमान प्रवास
देशात 1.3 कोटी लोकांनी विमान प्रवास केला. जुलै 2023 च्या तुलनेत यावर्षी प्रवास करणाऱ्यांची संख्या 7.3 टक्क्यांनी वाढली आहे. हिंदुस्थानात विमान तिकिटाच्या किंमतीत दिवसेंदिवस भरमसाठ वाढ होत आहे. तरीही विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. देशांतर्गत हवाई मार्गावरील विमान भाड्यात 10 ते 25 टक्के वाढ झाली आहे. गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी सणामुळे तिकीट दरात वाढ झाली आहे.
अमेरिकेत तीन हिंदुस्थानींचा मृत्यू
अमेरिकेच्या टेक्सास येथे झालेल्या भीषण कार अपघातात तीन हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना टेक्सासच्या लॅम्पासस काऊंटी येथे घडली. मूळचे हिंदुस्थानी असलेले अरविंद मणी (45), पत्नी प्रदीपा अरविंद (40) आणि मुलगी एंड्रिल अरविंद (17) हे तिघे अपघातात जागीच ठार झाले. अरविंद मणी यांचा 14 वर्षांचा मुलगा आदिरायन हा त्यांच्यासोबत कारमध्ये नव्हता. त्यामुळे तो वाचला, परंतु कुटुंबात तो आता एकटाच राहिला आहे.
इटलीत याट बुडाली; सहाजण बेपत्ता
ब्रिटिशमधील प्रसिद्ध उद्योगपतीची याट इटलीत बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 6 जण बेपत्ता आहेत. या याटमध्ये अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडातील 10 क्रू मेंबर्स आणि 12 प्रवासी असे एकूण 22 जण होते. यात कूकचा मृत्यू झाला असून इतर सहा जण बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांमध्ये ब्रिटनचे प्रसिद्ध सॉफ्टवेअर बिझनेसमन माईक लिंच आणि त्यांची 18 वर्षांची मुलगी हन्ना यांचाही समावेश आहे.
चीन-फिलिपिन्स पुन्हा आमने सामने
चायनीज समुद्रामध्ये चीन आणि फिलिपाइन्सची जहाजे पुन्हा एकदा आमने सामने आली. या दोन्ही जहाजांमध्ये जोरदार टक्कर झाली. ही घटना वादग्रस्त सेकंड थॉमस शोलजवळ घडली. चीनच्या तटरक्षक दलाने यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. फिलिपाइन्सच्या जहाजाने सिस्टीमचे उल्लंघन केले आहे. त्यांनी अशी चिथावणीखोर कृत्ये केल्यास त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा जबर इशारा चीनने दिला. चीनच्या या इशाऱ्यावर फिलिपिन्सनेही जोरदार प्रत्युत्तर देत यामागे चीनचाच हात असल्याचे म्हटले आहे.