मुख्यमंत्र्यांचा पीए नको, भूमीपुत्र द्या! अभिमन्यू पवारांच्या उमेदवारीवरून राडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औसा विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव अभिमन्यू पवार यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवरून असंतोषाचा वणवा भडकला आहे. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील यांच्यासह औसातील भाजप तसेच शिवसेना नेत्यांनी पवार यांची उमेदवारी मागे घेण्यात यावी यासाठी राष्ट्रीय महामार्गावर ठाण मांडले आहे. कार्यकर्ते रस्त्यावर बसून असल्यामुळे दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाने काल विधानसभेसाठी 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात औसा येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव अभिमन्यू पवार यांना तिकीट देण्यात आले आहे. मुळात औसा हा शिवसेनेचा मतदारसंघ. शिवसेनेचे दिनकर माने हे दोन वेळा येथून निवडूण आले आहेत. गेल्या वेळेस काँग्रेसचे बसवराज पाटील यांनी त्यांचा पराभव केला. यावेळी अभिमन्यू पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होताच त्याला स्थानिक भाजपमधूनच विरोध सुरू झाला. काल उमेदवारी जाहीर होताच नाराजीचे रूपांतर भडका उडण्यात झाले.

‘मुख्यमंत्र्यांचा पीए नको, भूमीपुत्र द्या’ अशी मागणी करत बुधवारी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद निलंगेकर यांनी कार्यकत्र्यांसह राष्ट्रीय महामार्गावर ठाण मांडले. शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने हे देखील या आंदोलनात सहभागी झाले. अनेक तास कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मांडून असल्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या कित्येक किलोमीटर लांब रांगा लागल्या. यावेळी भाजपचे किरण उडगे, बजरंग जाधव, सूर्यकांत शिंदे, नितीन लातूरे, गोपाळ धानुरे आदी उपस्थित होते.

कोण आहेत अभिमन्यू पवार?
अभिमन्यू पवार हे औसा तालुक्यातील उंबडगा येथील रहिवासी आहेत. दयानंद महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. बालपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रीय होते. महाविद्यालयीन जीवनात ते अभाविपमध्ये सक्रीय होते. 2014 मध्ये ते भाजपचे महाराष्ट्र प्रभारी ओम माथूर यांचे खासगी सचिव होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे खासगी सचिव बनले.

संभाजी पाटील निलंगेकरांची तक्रार करणार
औसा मतदारसंघातून अनेकांनी उमेदवारी मागितली. मी देखील पक्षाकडे मागणी केली. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला. तिकीट जाहीर झाल्यानंतर हा विरोध संपायला हवा होता. मात्र आज पक्षाच्या शिस्तीचे धिंडवडे काढण्यात आले. आपण पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार करणार आहोत, असे अभिमन्यू पवार यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले.