
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील सुकणी येथे एका 72 वर्षांच्या वयोवृद्धाचा अश्लिल व्हिडीओ काढून त्याच्याकडून 14 लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकणी येथील विठ्ठल दिगंबर मुळे हे 5 मे, 2022 रोजी शेतात पिकाला पाणी देत असताना एक महिला आणि पुरुष त्या ठिकाणी आला. त्यांनी मुळे यांनी जबरदस्ती दारू पाजली आणि बेशुद्ध केले. बेशुद्धावस्थेत असताना त्यांच्यासोबत महिलेचा अश्लिव व्हिडीओ काढण्यात आला. हा व्हिडीओ दाखवत तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू अशी धमकी देत पैशांची मागणी केली.
पीडिताने 25 मे रोजी अहमदपूर बस स्टॉप येथे संबंधित महिलेसोबत असणाऱ्या दोघांना 10 लाख रुपये दिले. पुन्हा 4 जून रोजी आरोपींनी आणखी 2 लाख रुपयांची मागणी केली. पीडिताने ही माहिती जवळच्या नातेवाईकला दिली. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. अखेर 15 जून रोजी दुपारी साडे चार वाजता पैसे स्वीकारताना साध्या वेशातील पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडले. मुसा अलाउद्दीन शेख (रा. चारटांगी, अहमदपूर), रुपाली ढगे (रा. अहमदपूर) आणि जाकीर गुलाबसाब शेख अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास अहमदपूर पोलीस करत आहेत.


























































