तावरजा गावात भीषण पाणी टंचाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। लातूर

औसा व लातूर या दोन तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या उटी बु. येथील तावरजा मध्यम प्रकल्प पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी अद्याप कोरडेठाक आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ या म्हणीप्रमाणे या परिसरावर पाणी टंचाईचे तीव्र पडसाद दिसत आहेत.

या मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता 27. 720 दलघमी इतकी असून 36 वर्षात सोळा वेळा पूर्ण क्षमतेने भरला आहे. या मध्यम प्रकल्पातून औसा शहर आलमला पाणीपुरवठा वीस खेडी, पाचखेडी, गंगापूर, पेठ, खंडापूर इत्यादी गावांना पाणीपुरवठा केला जात होता. मात्र हा मध्यम प्रकल्प कोरडा पडल्याने या परिसरातील नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे. यावर्षी या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा झाल्याने पाणीसाठ्यातही वाढ होणार आहे.

तावरजा मध्यम प्रकल्पाची 1982 मध्ये उटी बु. येथे उभारणी झाली. त्यानंतर केवळ 16 वेळा पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प भरला होता. हा प्रकल्प कोरडा पडलेले उटी बु., भादा, काळमथा, लखनगाव, बहाणपूर बागायतदार शेतकऱ्यांना आपल्या उसावर नांगर फिरवावा लागला होता. या परिसरात सध्या पाच टक्के उसाचे क्षेत्र असून तेही पाण्याअभावी वाळत आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरीही या परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने सोयाबीन पिकासह ऊस, तूर, मुग, उडीद हेही पिक येतील का नाही याची शेतकऱ्यांना शाश्वती नाही. त्यामुळे या परिसरावर निश्चितच १९७२ च्या दुष्काळापेक्षाही यावर्षीची स्थिती गंभीर आपणास पाहावयास मिळत आहे.