उपवासाच्या दिवशी पाठवलं बटर चिकन! झोमॅटोसह हॉटेलला 55 हजारांचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

उपवासाच्या दिवशी एक नव्हे तर चक्क दोन वेळा चिकनची डिलीव्हरी केल्यामुळे झोमॅटोसह एका हॉटेलला 55 हजारांचा दंड झाला आहे. एका ग्राहकाने धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार ग्राहक न्यायालयात केली होती. त्या खटल्यात ग्राहक न्यायालयाने हा दंड ठोठावला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यात राहणारा षण्मुख देशमुख नावाचा हा तक्रारदार उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कार्यरत आहे. 31 मे रोजी त्यांचा उपवास होता. उपवास सोडण्यासाठी त्यांनी झोमॅटोवरून पनीर बटर मसाला या डीशची ऑर्डर दिली होती. ही डीश पुण्यातील हिंजेवाडी येथील प्रीत पंजाबी स्वाद या हॉटेलमधून आली होती. डिलीव्हरी मिळाली आणि बिल दिल्यानंतर काही वेळाने त्यांनी घरच्या नोकराला जेवण वाढण्यासाठी सांगितलं. जेवायला बसल्यानंतर ही डीश पनीर नसून बटर चिकन असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी पुन्हा झोमॅटोवरून पनीर बटर मसाल्याची ऑर्डर दिली. मात्र, दुसऱ्या वेळीही त्याच हॉटेलकडून पनीर ऐवजी बटर चिकनची डिलीव्हरी करण्यात आली.

या प्रकारानंतर देशमुख यांनी झोमॅटोकडे तक्रार करण्याचाही प्रयत्न केला. मात्र तिथून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेत धार्मिक भावना दुखावल्याबद्दल पाच लाख रुपये नुकसान भरपाई आणि 1 लाख रुपये मानसिक छळाची भरपाई मिळावी अशी तक्रार केली. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी झोमॅटोच्या प्रतिनिधींनी या प्रकरणात सर्वस्वी हॉटेलची चूक असून झोमॅटोकडून फक्त त्याची डिलीव्हरी झाल्याचा आणि तक्रारदार झोमॅटोची नाहक बदनामी करत असल्याचा युक्तिवाद केला. तर दुसरीकडे हॉटेलने चुकीची डीश डिलीव्हर झाल्याचं मान्य केलं. पण, झोमॅटो आणि हॉटेल यांच्यातील झालेल्या करारानुसार तसेच ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत झोमॅटोही दोषी असल्याचं सिद्ध झालं.

त्यानुसार, उपवासाच्या दिवशी दोन वेळा शाकाहारी डीशची ऑर्डर देऊनही दोन्ही वेळा मांसाहारी डीशची डिलीव्हरी करणं आणि तक्रारदाराकडे दुर्लक्ष करणं, यातून ग्राहकाला शारीरिक आणि मानसिक त्रास झाल्याचं न्यायालयापुढे सिद्ध झालं. त्यावर न्यायालयाने झोमॅटो आणि प्रीत पंजाबी स्वाद या हॉटेलला 45 दिवसांच्या आत 50 हजार रुपये नुकसान भरपाई आणि 5 हजार रुपये मानसिक त्रासाची भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले.