
गणराय हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. कोकणात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. कोकणात सण, उत्सवात अनेक रुढी परंपरा आहेत व त्या निरंतर पाळल्या जात आहेत. एका पिढीकडून पुढच्या पिढीत हा वारसा पुढे पुढे चालत राहिल्याने या प्रथा-परंपरांना शेकडो वर्षांचा इतिहास आहे. देवरुखातील घरगुती गणेशोत्सवातही अशा प्रथा परंपरा पाहायला मिळतात.
देवरुख आठल्ये- सप्रे – पित्रे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र घाणेकर यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवात पुजली जाणारी गणेशमूर्ती ही विशेष ठरली गेली आहे. या गणेशमूर्तीला जर्मन गणेश म्हणुन संबोधले जाते. या गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य असे आहे की ही गणेशमूर्ती उजव्या हाताने आशीर्वाद देण्याऐवजी डाव्या हाताने आशीर्वाद देणारी आहे. अशी गणेशमूर्ती मुद्दाम तयार करून घ्यावी लागते व ती देवरुखमधील मूर्तीकार उदय भिडे दरवर्षी तयार करुन करतात.
जर्मन गणेशाचा इतिहास कुठेही लिखित स्वरुपात उपलब्ध नाही. मात्र, घाणेकरांकडे दरवर्षी याच जर्मन गणेशाचे पूजन केले जात आहे. अशा गणेशाची आराधना करणारी ही तिसरी पिढी आहे. घरगुती गणेशोत्सवातील ही आगळी वेगळी परंपरा आजही जोपासली जात आहे हे विशेष. डाव्या हाताने आशीर्वाद देणारी जर्मन गणेशमूर्ती देवरुखवासीयांसाठी कुतुहलाचा विषय ठरत आली आहे.



























































