
सामना प्रतिनिधी, नाशिक
नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी पुन्हा एकदा बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. इगतपुरी तालुक्यातील आशाकिरणवाडी येथे रविवारी सहाजणांवर हल्ला करून त्यांना जखमी करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सोमवारी दिवसभर प्रयत्न सुरू होते. या परिसरातील गावांमधील नागरिकांत मोठी दहशत निर्माण झाली आहे. नाशिकजवळील गिरणारे येथे शनिवारी एका शेतकऱ्यास जखमी करणाऱ्या बिबट्याला आज जेरबंद करण्यात आले, तर कळवणमध्ये घरात घुसलेल्या बिबटय़ाला रविवारी पकडण्यात आले.
काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील सावरकरनगर भागात दोनवेळा, तर मखमलाबाद शिवारात एकदा असे तीन बिबटे पकडण्यात आले. निफाड, मालेगाव येथेही बिबटय़ांना जेरबंद करण्यात आले. नाशिकजवळील देवळाली कॅम्प भागात बिबटय़ाचा बछडा आढळला होता. कालच्या घटनेमुळे आशाकिरणवाडी, वाघेरे, मालुंजे, कानडवाडी, मुंढेगाव, समनेरे आदी भागातील रहिवाशामंध्ये भीती निर्माण झाली आहे. या परिसरात दोन पिंजरे लावण्यात आले आहे. नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना वनखाते व पोलिसांनी दिल्या आहेत. रविवारी रात्री व सोमवारी दिवसभर बिबटय़ाचा शोध सुरूच होता. नाशिकजवळील गिरणारे येथे शनिवारी एका शेतकऱयावर हल्ला करून त्याला जखमी केले होते. आज सोमवारी या बिबटय़ाला जेरबंद करण्यात यश आले. कळवणच्या तिऱहळजवळील गांडूळमोक येथे उमेश बागुल यांच्या घरात घुसलेल्या बिबटय़ाला रविवारी जेरबंद करण्यात आले.
आता पुन्हा एकदा शहर व ग्रामीण भागात बिबटय़ाने धुमाकूळ घातला आहे. रविवारी आशाकिरणवाडी येथे भरदुपारी सचिन जोशी (20), हिरामण शेणे (20), भिवा शेणे (39), पंढरीनाथ शेणे (40), सागर शेणे (14) यांच्यासह वनपरिमंडळ अधिकारी ओंकार देशपांडे यांना जखमी केले. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले.































































