
मधुकर ठाकूर । उरण
उरण तालुक्यातील वाघधोंडी परिसरातील डोंगर परिसरात वावरणाऱ्या त्या संशयित बिबट्याचे ठसे उरण वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले आहेत. बिबट्याच्या शोधासाठी परिसरातील प्राणी मित्रांची मदत घेतली जात असुन वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी बिबट्याचा कसुन शोध घेत आहेत, अशी माहिती उरण वन विभागाचे अधिकारी शशांक कदम यांनी दिली. तसेच उरण डोंगर परिसरात जोपर्यत संशयित बिबट्याचा शोध लागत नाही तोपर्यंत डोंगर परिसरात वावरणाऱ्या प्रत्येक नागरिकाने सावधानता बाळगावी असे आवाहनही वन विभागाने केले आहे.
मागील पाच वर्षांपूर्वी या गाव परिसरातील डोंगर परिसरात बिबट्याचा, मोर, रान डुक्कर, ससा, हरिण, भेकर सारख्या इतर जंगलातील प्राण्याचा मोठ्या प्रमाणात वावर होता.परंतु वाढत्या शिकारीच्या घटना, वाढत्या औद्योगिकीकरणामुळे डोंगर परिसरात होणाऱ्या मातीच्या उत्खननामुळे जंगल संपत्तीचा ऱ्हास झाला आहे. त्यामुळे जंगलातील प्राण्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे कर्नाळा, अलिबाग, पेण, खोपोली आणि उरण परिसरातील डोंगरात वावरणारे अनेक जंगली प्राणी हे आता भक्ष्यांच्या शोधार्थ नागरीकांच्या वस्तीत शिरल्याचे अनेक वेळा घडलेल्या घटनेतून आढळून आले आहे. मंगळवारी (दि.१६) वाघधोंडी डोंगर परिसरात वसलेल्या कंटेनर यार्डमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराला बिबट्या गुरांच्या मागे धावताना दिसून आला होता. भयभीत झालेल्या सदर कामगारांनी या बिबट्याची खबर यार्डचे सुरक्षा रक्षक यांना दिली होती. सदर घटनेची दखल घेऊन उरण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर डोंगर परिसराची पाहणी केली असता त्यांना वाघाचे नव्हे तर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. संशयित बिबट्याचा शोध घेण्यासाठी परिसरातील प्राणी मित्रांचीही वनविभागाकडून घेतली जात आहे. सध्यातरी आणखी कोणत्याही अन्य इसमाला बिबट्या दिसलेला नसल्याची माहिती उरण वन विभागाचे अधिकारी शशांक कदम यांनी दिली.


































































