भाजीच्या टेम्पोत बसून बिबट्या कल्याणला आला, चिंचपाडा परिसरात हलकल्लोळ

कल्याण पूर्वेला असलेल्या चिंचपाडा परिसरात बिबट्या आल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. हा बिबट्या एका इमारतीमध्ये शिरला असून त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी पोहोचले आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून पोलीस आणि वन अधिकाऱ्यांनी स्थानिकांना घराची दारे आणि खिडक्या बंद करून घेण्यास सांगितली आहेत.

या भागात बिबट्या शिरल्याचे कळताच तो कुठे दिसतो का हे पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. आजूबाजूला जंगल नसताना हा बिबट्या या परीसरात कसा काय आला असा स्थानिकांना प्रश्न पडला होता. नाशिकवरून भाजी घेऊन टेम्पो आला होता, या टेम्पोमध्ये बिबट्या शिरला होता आणि टेम्पो कल्याणला पोहोचल्यानंतर या बिबट्याने धूम ठोकली आणि तो जवळच्या एका इमारतीत शिरला होता.