
श्रीरामपूर शहरातील मोरगेवस्ती परिसरात रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास चार वर्षे वयाच्या नर बिबटय़ाने धुमाकूळ घातला. बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात वन विभागाच्या एका कर्मचाऱ्यासह सहाजण जखमी झाले आहेत. जखमींवर नगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चार तासांच्या प्रयत्नांनंतर बिबटय़ाला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
वन कर्मचारी लक्ष्मण किमकर (वय 50), वृषभ अंबादास निकाळजे (वय 8), श्रद्धा हिंगे (वय 11), कांतासेठ कुमावत (वय 35), बाळासाहेब आडांगळे (वय 55), राहुल मारुती छल्लारे (वय 42), मारुती शिंदे (वय 50) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. खासगी शिकवणीसाठी जाणारी श्रद्धा हिंगे व तिचे वडील सचिन यांच्यावर रविवारी सकाळी बिबटय़ाने अचानक हल्ला केला. यानंतर बिबटय़ाने अंबादास निकाळजे यांच्यावर हल्ला केला. बिबटय़ा शहरात घुसल्याची माहिती मिळताच नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. आरडाओरडा, फटाक्यांच्या आवाजामुळे बिबटय़ा सैरावैरा पळत सुटला. दिसेल त्याच्यावर हल्ला करीत होता. यात सहा नागरिक जखमी झाले.
वन विभागाचे कर्मचारी किमकर यांनी बिबटय़ाला पकडण्यासाठी प्रयत्न केले. त्यात ते जखमी झाले. जिल्हा वन अधिकारी सुवर्णा माने व त्यांच्या पथकाने भरवस्तीत लपून बसलेल्या बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले. दोन घरांच्या मधील मोकळ्या जागेत अडकलेल्या बिबटय़ाला ‘डार्ट’ मारून बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर त्याला वन विभागाने ताब्यात घेतले. प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक संजय सानप, नगराध्यक्ष अनुराधा आदिक घटनास्थळी दाखल झाले होते.
‘लोकवस्तीत घुसलेला बिबटय़ा घाबरलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे दिसेल त्याच्यावर तो हल्ला चढवीत होता. बिबटय़ाला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. बरेच लोक सेल्फी काढत होते. बिबटय़ाच्या हल्ल्यात वन कर्मचाऱ्यासह सहा नागरिक जखमी झाले असून त्यांच्या उपचारांचा खर्च वन विभागाकडून करण्यात येणार आहे. तसेच बेशुद्ध केलेल्या बिबटय़ावर उपचार करून त्याला सुरक्षित ठिकाणी सोडले जाणार आहे.’
– सुवर्णा झोलमाने, वन अधिकारी, नगर.


























































