
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
दक्षिण मुंबईमधील एलआयसीच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या समस्यांना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी वाचा फोडली असून त्यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्यासह अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली आहे. या भागातील अनेक इमारतींचा मालकी हक्क एलआयसीकडे आहे. या सगळ्या इमारती तारण मालमत्ता असून या इमारतींमध्ये 2000 पेक्षा अधिक कुटुंबे 60 पेक्षा अधिक वर्ष रहात आहेत. या इमारती मोडकळीस आलेल्या असून त्या धोकादायक स्थितीमध्ये आहेत. एलआयसी या रहिवाशांकडून भाडे घेते मात्र इमारतींची दुरुस्ती करायला एलआयसी तयार नाही.
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी रहिवाशांच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन केंद्रीय अर्थमंत्री श्री. अरुण जेटली यांची दिल्ली येथे भेट घेतली व सविस्तर परिस्थिती कथन केली. सावंत यांनी या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे एक निवेदनही जेटली यांना दिले. सावंत यांनी रहिवाशांना इमारत पुनर्विकासाची परवानगी द्यावी किंवा एलआयसीला पुनर्विकास करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली. हजारो लोकांचे जीव धोक्यात असल्याने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंतीही शिवसेनेच्या खासदारांनी केली आहे. यावर जेटली यांनी मालकी हक्क हस्तांतरित करण्याच्या पर्यायाबद्दल सकारात्मक दृष्ट्या विचार करून लवकरात लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे.




























































