
सामना प्रतिनिधी । लातूर
रुग्णांना सुविधा मिळाव्यात यासाठी रेल्वे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे .जगातील हे पहिलेच रेल्वे रुग्णालय असून ‘लाईफ लाईन’ या नावाने ते ओळखले जाते. लाइफ लाइन एक्सप्रेस पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून लातुरात येऊ घातली असून त्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी संबंधित संस्थेच्या प्रतिनिधींनी मंगळवारी पालकमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली.
‘लाईफ लाईन एक्सप्रेस’च्या माध्यमातून जवळपास सर्वच आजारावर उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. चालत्या रेल्वेमध्ये चालवले जाणारे हे जगातील एकमात्र रुग्णालय आहे. हे रुग्णालय लातुरात यावे यासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील प्रयत्नशील होते. त्यासाठी हा उपक्रम राबवणारी संस्था ‘इंपॅक्ट इंडिया फाऊंडेशन’शी त्यांचा संवाद केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून हे रुग्णालय लातूर येथे घेऊन येण्यास संबंधित संस्थेने तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी संबंधित ‘इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशन’च्या प्रतिनिधींनी मंगळवारी लातूर येथे येऊन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची भेट घेऊन चर्चा केली.
पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी ही चर्चा केली. ही ‘लाईफ लाईन एक्सप्रेस’ लातूरमध्ये आल्यानंतर हजारो रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे.

































































