पुरुषांनी पस्तीशीनंतर गंभीर आजारांचा धोका टाळण्यासाठी आहारात करावे ‘हे’ बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या वयानुसार, पुरुषांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वयोमानानुसार, गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. पस्तीशीनंतर पुरुषांनी आहारात आरोग्यादायी अन्नपदार्थांचा समावेश केला तर शरीर निरोगी राहण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे या वयातील पुरुषांनी आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. 35-40 वयोगटातील पुरुषांना मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, थायरॉईड यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. या सर्व आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी पुरुषांनी आपल्या आहाराची योग्य काळजी घेतली पाहिजे. जाणून घेऊया 35 वर्षांनंतर पुरुषांचा आहार कसा असावा.

शरीर हायड्रेट ठेवा
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. पुरुषांनी आपले शरीर हायड्रेटेड ठेवले पाहिजे. यासाठी रोज 7 ते 8 ग्लास पाणी प्या, तसेच जर साधे पाणी पिणे शक्य नसेल तर त्याऐवजी नारळपाणी, लिंबूपाणी आणि सरबतंही पिऊ शकता. यामुळे शरीर हायड्रेट राहायला मदत होईल.

हिरव्या पालेभाज्यांचे सेवन
पुरुषांनी आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी हिरव्या पालेभाज्या जरूर खाव्यात, कारण वाढत्या वयानुसार पुरुषांचे वजनही वाढते, त्यामुळे हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते. निरोगी आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरते. त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले राहावे याकरिताही आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा.

फायबरयुक्त आहार
शरीरावर दिसणारी वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी फायबरयुक्त आहार घ्यावा. आहारात कडधान्य, सुकामेवा इत्यादी फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास अनेक शारीरिक समस्यांपासून रक्षण व्हायला मदत होते. पचनसंस्थेच्या तक्रारी दूर होतात. फायबरयुक्त पदार्थांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहाते. कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहते. गहू, राई, ओट्स, बार्ली, कॉर्न, ब्राउन राईस, ब्लॅक राईस, बाजरी, एवोकॅडो, रास्पबेरी, सुकामेवा, नारळ, अंबाडीच्या बिया, चिया सीड्स, केळी, सफरचंद, गाजर, राजमा, चणा, ओट्स, पॉपकॉर्न, डार्क चॉकलेट इत्यादी पदार्थांमध्ये फायबर असते. आहारात या पदार्थांचा समावेश करू शकता.

तळलेले आणि मसालेदार अन्नपदार्थ खाणे टाळा
वयाच्या 35 नंतर बाहेरचे अन्न खाणे टाळावे तसेच जास्त तळलेले, मसालेदार अन्नपदार्थ खाणेही टाळावे; कारण वाढत्या वयाबरोबर पुरुषांची पचनक्रियादेखील कमकुवत होऊ लागते. त्यामुळे सकस अन्न खाण्यावर भर द्यावा.