
वयाच्या तिशीनंतर मानवी शरीरातील चयापचय क्रिया मंद व्हायला सुरुवात होते. त्यामुळे या वयानंतर कमी मीठ, तेल-मसाले आणि साखर असलेले पदार्थ खावेत, कारण तिशीनंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. त्यामुळे तुम्हाला पूर्वीसारखे तंदुरुस्त राहण्याकारिता आहारात काही अन्नपदार्थांचा कमीत कमी प्रमाणात समावेश करणे आवश्यक आहे. या वयानंतर आहार आणि जीवनशैलीत काही चांगले बदल करणे आवश्यक आहे. जाणून घेऊया अशा काही अन्नपदार्थांबद्दल ज्यामुळे शरीरात वृद्धत्वाची लक्षणे लवकर वाढू शकतात.
फ्लेवर्ड दही
आईस्क्रीम, मिठाई, कँडी, कुकीज यासारखे गोड पदार्थ खाणे लोकं टाळतात, मात्र हे पदार्थ खाणे टाळणे म्हणजे स्वत:ची फसवणूक करण्यासारखे आहे. प्रत्यक्षात ब्रेड, केचअप आणि फ्लेवर्ड दही हे गोड पदार्थांचे मुख्य स्त्रोत आहेत, कारण फ्लेवर्ड दह्यामध्ये एक वाटी आईस्क्रीम इतकी साखर असू शकते. त्यामुळे फ्लेवर्ड दही कमी प्रमाणात खावे.
कॅन सूप (हवाबंद सूप)
दिवसभरात पाच ग्रॅमपेक्षा जास्त प्रमाणात मीठ खाणे प्रत्येक व्यक्तिसाठी धोकादायक असू शकते. प्रत्येकाने दिवसभरात 2,300 ग्रॅमपेक्षा कमी प्रमाणात मिठाचे सेवन करणे आवश्यक आहे तसेच कॅन किंवा हवाबंद डब्यातील सूप सेवन करणे टाळावे. त्यामुळे दिवसातून शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त सोडियम मिळते. इतकेच नाही, तर अनेक सूपमध्ये बीपीए नावाचे रसायन असते. यामुळे कर्करोग, वंध्यत्व आणि वजन वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच डबाबंद सूपऐवजी घरीच ताजे सूप बनवून प्यावे.
शीत पेय
कोल्ड्रिंक्स अर्थात शीत पेये हा तुमचा कट्टर शत्रू समजा. या पेयांमध्ये कर्करोगास कारणीभूत रंगांचा (फूड कलर्स) वापर केला जातो आणि ते अतिरिक्त साखर शरीरात पोहोचवतात. साखरेचा केवळ महिलांच्या ओव्हुलेशनवरच परिणाम होत नाही, तर पुरुषांच्या शुक्राणूंवरही वाईट परिणाम होतो. यामुळे गर्भधारणेत अडथळे येऊ शकतात. स्त्री आणि पुरुष दोघांसाठी शीत पेय पिणे धोकादायक आहे.
कॉकटेल आणि बियर
आहारतज्ज्ञांच्या मते, जसजसे आपले वय वाढत जाते, तसतसे आपले शरीर अल्कोहोलचे योग्य पचन करण्यास सक्षम होते. त्यामुळे अल्कोहोलपासून दूर राहावे. दारू शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचवते. तुमचे शरीर 20 ते 30 वयोगटात ज्या प्रकारे कार्य करते ते 30 नंतर करू शकत नाही.
सोडियमयुक्त चायनिज फूड
बाजारात सहज उपलब्ध असलेल्या अनेक चायनीज पदार्थांमध्ये भरपूर सोडियम असते. यामुळे त्वचेतील ओलावा काढून टाकला जातो आणि रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. हे पदार्थ खाल्ल्यामुळे त्वचा कोरडी, रुक्ष आणि निर्जीव दिसू लागते. अकाली वृद्धत्वाच्या लक्षणांपैकी हे एक लक्षण आहे.
आइस्ड कॉफी
आइस्ड कॉफीमुळे शरीरावरील अकाली वृद्धत्वाची लक्षणे वेगाने वाढू शकतात. दिवसा आपली त्वचा हानिकारक अतिनील किरणांच्या संपर्कात येते ज्यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्याच वेळी, जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले शरीर आणि त्यातील पेशी त्वचेचे रक्षण करतात. कॅफीनमुळे झोपेचा त्रास होतो, त्यामुळे शरीराला रात्रीचे काम करणे कठीण होऊ शकते. याचा परिणाम शरीरावर होतो आणि अकाली वृद्धत्वाची लक्षणे वाढतात.
याशिवाय कॅनमधील फळांचे, भाज्यांचे सूप, वजन कमी करण्याचे बार, फ्रोझन फूड, प्रक्रिया केलेले पीनट बटर, स्पोर्ट्स ड्रिंक्स, चिप्स-वेफर्स आणि कॅन केलेला कॉफी क्रीम, जे वर्षानुवर्षे कारखाने आणि स्टोअरमध्ये ठेवले जातात, अशा अनेक पदार्थांमुळे वृद्धत्वाची लक्षणे वाढू शकतात.




























































