धबधबा : चला भिजायला …!

4293

पावसाने धबधबे गच्च भरलेत आणि मनमुराद ओसंडताहेत… चला… मग… धबधब्याखाली भिजायला…

गेले काही दिवस महाराष्ट्राला भिजवणाऱ्या जलधारांनी नद्या, ओहोळ आणि धबधबे पुन्हा जिवंत झाले आहेत. उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या या जलधारा अंगावर झेलण्याची मजा काही औरच असते. घाटमाथ्यातून खळखळून वाहणाऱ्या या धबधब्यांवर पर्यटकांची पावले आपसूकच वळत असून ओल्याचिंब वातावरणाचा ते आनंद घेत आहेत. चला तर या धबधब्यांची माहिती घेऊया.

मुंबई-पुण्यातील पर्यटनप्रेमींसाठी सोयीचे ठरणारे अनेक धबधबे रायगड आणि ठाणे जिल्हय़ांत आहेत, पण पर्यटकांच्या आततायीपणामुळे या धबधब्यांच्या ठिकाणी बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याची दखल घेत शासनाने ठाणे, रायगड जिल्हय़ांतील धबधब्यांवर सप्टेंबरपर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे भटकंती प्रेमींचा हिरमोड झाला असून भिजायला कुठे जायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे. जाणाऱ्या पर्यटकांनी ठाणे, रायगड जिल्हय़ातील धबधब्यांचा मोह टाळत आपली वाट कोकणच्या दिशेने वळवळी आहे. निसर्गाने सढळहस्ते भरभरून दिलेल्या आणि पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्गात तर या धबधब्यांची काही कमतरताच नाही.

आंबोली धबधबा

सावंतवाडी तालुक्यातील पर्यटनस्थळ तसेच थंड हवेचे ठिकाण म्हणून आंबोली प्रसिद्ध आहे. कोकणातून कोल्हापूरला जाताना आंबोली घाट लागतो. या घाटातच हा धबधबा आहे. धबधब्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी पायऱ्या, या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी आणि उंच कडेकपाऱ्यांतून कोसळणाऱ्या जलधारांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पावसाच्या मोसमात या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

पाडाघर धबधबा

देवगड तालुक्यातील पाडाघरवाडी येथे हा धबधबा असून शिरगाव सैतावडे फाटय़ावरून पर्यटकांना या धबधब्यावर पोहोचता येईल. या धबधब्याचा प्रवाह खोल असून पर्यटकांनी जरा जपूनच या ठिकाणी धबधब्याचा आनंद घेतला पाहिजे. धबधब्याबरोबरच येथील हिरवागार निसर्ग पर्यटकांना वेगळीच ऊर्जा देतो.

सावडाव धबधबा

कणकवली तालुक्यातील सावडाव हा धबधबा पावसाळय़ात पर्यटकांनी बहरतो. ६० ते ७० फूट उंचीवरून कोसळणाऱ्या शुभ्र धारा डोळय़ांचे पारणे फेडतो. सर्वांना आनंद लुटता येईल असा सुरक्षित धबधबा आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वेळणे फाटा येथून या धबधब्यावर जाता येते. धबधब्याच्या प्रवाहाच्या बाजूलाच गुहेसारखा भाग असून येथील विस्तीर्ण डोहात आंघोळीचा आनंद घेता येतो.

मांगेली धबधबा

सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या वेशीपाशी दोडामार्ग तालुक्यात मांगेली धबधबा असून कर्नाटक, गोवा येथील पर्यटकही या धबधब्याला आवर्जून भेट देतात. गर्द वनराईत हा धबधबा लपला असून येथील निसर्गसौंदर्य पर्यटकांना मोहित करते. धबधब्यापर्यंत चालत गेल्यास पर्यटकांना निसर्ग भटकंतीचा आनंद घेता येईल.

मनचे धबधबा

देवगड तालुक्यातील मनचे धबधबा प्रसिद्ध असून या धबधब्यावर मान्सूनमध्ये पर्यटकांची गर्दी होते. काळ्या दगडांवर पडणारे पांढरेशुभ्र पाणी निश्चितच आकर्षित करतात. तेथे जाण्यासाठी खडकाळ वाट, त्याभोवतीचे लोखंडी रेलिंग यामुळे धबधब्याच्या पायापर्यंत पर्यटकांना जाता येते. जवळच व्याघ्रेश्वराचे मंदिर असून व्याघ्रेश्वर धबधबा म्हणूनही हा धबधबा प्रचलित आहे.

नापणे धबधबा

बारमाही वाहणारा धबधबा म्हणून ओळख असलेल्या नापणे धबधबा हा वैभववाडी तालुक्यातील प्रसिद्ध धबधबा आहे. नाधवडे येथे या धबधब्याचा उगम होतो. तरेळे येथून 25 ते 30 मिनिटांत या धबधब्यावर पर्यटकांना जाता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या