
मुंबई विद्यापीठाच्यावतीने घेण्यात येणाऱया तृतीय वर्ष एलएलबी परीक्षेतील गोंधळ संपायचे नाव घेत नाही. आज बुधवार, 3 मेपासून ही परीक्षा सुरू होत असून परीक्षेच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देण्यात आले. मात्र हे हॉलतिकीट पाहून लॉचे विद्यार्थी हतबल झाले आहेत. विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला एका विषयाचा, मात्र हॉलतिकिटावर नोंद भलत्याच विषयाची असल्याचे समोर आले आहे. परीक्षा तोंडावर असताना अभ्यास करायचा की विद्यापीठाला चूक दाखवून द्यायची असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे.
तृतीय वर्ष एलएलबी अभ्यासक्रमाची सहाव्या सत्राची परीक्षा उद्यापासून सुरू होत असून 24 मेपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे. अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्र परीक्षेवेळी विद्यार्थ्यांनी सहाव्या सत्र परीक्षेचा अर्ज भरला होता. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना एकूण आठ विषयांपैकी चार विषय निवडायचे होते. या विषयानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केली, मात्र आता हॉलतिकीट मिळाल्यावर विद्यार्थ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. परीक्षा अर्जात जे विषय विद्यार्थ्यांनी दिले होते त्याऐवजी दुसऱयाच विषयाची नोंद हॉलतिकिटावर आहे. त्यामुळे आता नेमकी कोणत्या विषयाची परीक्षा द्यायची असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
वर्षभर ज्या विषयांचा अभ्यास केला त्या विषयाची परीक्षा द्यायला मिळाली नाही तर पास कसे होणार याची चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे. याप्रकरणी आता विद्यापीठाकडे तक्रार कशी करणार हादेखील प्रश्न आहेच. काही विद्यार्थ्यांनी तर विद्यापीठाशी वाद घालण्यापेक्षा हॉलतिकिटावर नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे.






























































