कमी पैशांत घर चालू शकते

>> सुनील तावडे (ज्येष्ठ अभिनेते)

‘माझा होशील ना’ ही मालिका माझी झी वाहिनीवर सुरू आहे. त्याचं महिन्यातून एक दहा बारा दिवस शूटिंग असतं. तेव्हा घराबाहेर जाणं होतं. पण मी काळजीही तेवढीच घेतो. सकाळी शूटिंग असो नसो पाच वाजता उठतो प्राणायाम, योगासनं करतो. त्यानंतर गरम पाण्यात लिंबू पिळून ते पाणी पितो. नंतर वाफ घेतो. बाहेर जाताना मास्क लावून जातो. सॅनिटाइज करतो. बाहेरून घरात आल्यावर स्वतःला सॅनिटाइज करतो. घरी आल्यावर स्वच्छ आंघोळ करतो. तसेच शूटिंगच्या सेटवरही आमची बरीच काळजी घेतली जाते. सेटवर जेव्हा आम्ही जातो तेव्हा मास्क लावूनच आत जातो. मग आम्हाला ऑक्सिमीटर, टेम्परेचर तपासून आत सोडलं जातं. नंतर सेटवर आम्हाला काढा दिला जातो, हळद घालून दूध दिलं जातं. शूटिंग सुरू होण्याआधी तिथली जागा सॅनिटाइज केली जाते तसेच पॅकअपनंतरही पूर्ण सेटवर सॅनिटाइज केले जाते. अशा पद्धतीने आम्ही खूप काळजी घेतो. अजूनपर्यंत मी योगासने, प्राणायाम यात खंड पडू देत नाही. फुफ्फुसांची क्रिया वाढवण्यासाठी आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कटाक्षाने लक्ष देतो आणि मला वाटतं प्रत्येकाने ती काळजी घ्यायला हवी.

या लॉकडाऊनमधली सक्तीच्य सुट्टीचा मी बराच सदुपयोग केला. बरीच पुस्तकं वाचायची राहिली होती ती वाचली. यात ‘स्वामी’ वाचली, फातिमा भुट्टोंची ‘द रनवेज’ इंग्लिश कादंबरी वाचली. वेगवेगळ्या वेबसिरीज बघितल्या, बघतोय. आऊटसायडर, डार्क, स्पेशल ऑप्स या वेबसिरीज पाहिल्या, वेगवेगळी नाटकं बघितली. मालिका बघणं सुरूच आहे. बघायचे राहून गेलेले आणि बघितलेले चांगले चांगले सिनेमे पाहिले. त्यावर मग घरात आम्ही चर्चा करायचो. तसेच डॉक्टर आणि पोलिसांच्या कर्तव्यदक्षाला सलाम म्हणून काही व्हिडीओ फिल्म बनवल्या. अशा प्रकारे स्वतःला या काळात फार व्यस्त ठेवलं. खरंतर आजपर्यंत एवढा मोकळा वेळ कुटुंबासोबत इच्छा असतानाही घालवता आला नाही. आमच्या घरात सगळेच काम करत असल्याने एकत्र घरी असण्याचा प्रश्नही आला नाही. पण या सक्तीच्या सुट्टीच्या निमत्ताने आम्ही सगळे एकत्र आलो, एकमेकांच्या आणखी जवळ आलो. एकमेकांच्या नवीन नवीन गोष्टी समजायला लागल्या, काही त्रुटी कळायला लागल्या आणि त्यावर मात कशी करायला हवी तेही कळायला लागले. घरात मस्करी वाढली होती, कधी मनात आले तर मनसोक्त नाचायचो, अशी बरीच धमाल लॉकडाऊनमध्ये केली. माझं म्हणणं असं आहे की, कोरोना पॉझिटिव्ह नसलं तरी मनाने सकारात्मक राहणं फार गरजेचं आहे. त्यामुळे या काळात मी सकारात्मक होतो आणि घरच्यांनाही सकारात्मक ठेवत होतो. कुठल्याही गोष्टीत लगेच घाबरून न जाता थंड डोक्याने विचार करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो.

खरं तर कोरोनाने कमी पैशात घर चालू शकतं याची जाणीव करून दिली. आपणच आपल्या गरजा फार वाढवून ठेवल्या होत्या. पण कोरोनाने आपल्याला शिकवलं की जगण्यासाठी आपल्याला फार गरजांची आवश्यकता नाही. सगळ्यात महत्वाचं एकत्र कुटुंबात राहायला शिकवले आणि वेळेचा सदुपयोग कसा करावा हे शिकवलं कारण एवढय़ा व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळत नव्हता. छंद जोपासायला, आपल्या आवडी निवडी करायला वेळ मिळत नव्हता तो मिळाला. आपल्या आयुष्यात या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, नुसते पैसे कमावण्याच्या पाठीमागे न लागता आनंद कमावण्याची गोष्ट आम्हाला कोरोनाने शिकवली.

बाहेरून आल्यावर हातपाय धुणं, स्वतःला सकारात्मक ठेवणं, सायंकाळी शुभंकरोति म्हणणं या गोष्टी आपण विसरलो होतो. ते यानिमित्ताने सुरू होतील. कोरोनानंतर लोक स्वच्छतेच्या बाबतीत आणखी जागरूक होतील असे मला वाटते. लोकांनी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, स्वच्छता, शिस्त, टापटिपपणा किती गरजेचा आहे. सगळ्यांनीच आपलं आरोग्य उत्तम ठेवणं आवश्यक आहे. कारणं आरोग्य हेच आपलं खरं धन आहे. ते जर उत्तम असेल तर त्या कमावलेल्या पैशांचा उपभोग घेता येईल. त्याला जपणं गरजेचं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या