रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत जनतेचे रक्षण करू! उद्धव ठाकरे यांची विराट सभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

धर्मांध मोकाट सुटतात तेव्हा तुमच्या मदतीसाठी धावून कोण येते? शिवसैनिकच! आमच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत जनतेचे रक्षण करू असे वचनच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. ओवेसीसारखे किती आले आणि गेले. यांनी कितीही धडका मारल्या तरी या भगव्या बुरुजाच्या गडाचा एक चिराही निखळणार नाही असा जबरदस्त आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी आज मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर भगवे तुफान अवतरले होते. या विशाल सभेला मार्गदर्शन करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची सालटीच काढली. हिंदुत्वाला पराभूत करण्यासाठी 56 पक्षांचे कडबोळे एकत्र आले आहेत. यांच्या 56 पिढय़ा आल्या तरी दिल्ली, महाराष्ट्रावर फडकलेला भगवा आता खाली उतरणार नाही, तो डौलाने फडकतच राहणार असे त्यांनी ठणकावून सांगितले.

मराठवाडा ही साधुसंतांची भूमी आहे. निजाम, रझाकाराशी निकराचा संघर्ष करून, बलिदान देऊन मराठवाडय़ाने स्वातंत्र्य मिळवले आहे. पण मराठवाडय़ाच्या नशिबी निसर्गाने दुष्काळाचे भोग लिहिले आहेत. दुष्काळाच्या पडछायेत आमचा मराठवाडा सातत्याने आहे. या अस्मानीला टक्कर देण्यासाठी आम्ही सरकारसोबत आहोत. ही युती मराठवाडय़ासाठी केली आहे, दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱयांना दिलासा मिळावा म्हणून केली आहे असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, मराठवाडय़ाचा टँकरवाडा झालाय हे ऐकताना अतिशय दुःख होते. दुष्काळी कामे करायला जावे तर आचारसंहिता आडवी येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी औसा येथे एकाच व्यासपीठावर होतो. तेव्हाही मी आमच्या मराठवाडय़ाच्या नशिबी आलेला दुष्काळ घालवा असेच सांगितले.

संभाजीनगरातले सगळे प्रश्न सोडवणार
शहरात पाण्याची वानवा आहे. कचऱयाचा प्रश्न आहे. मी कोणतीही समस्या विसरलेलो नाही. माझे आयुष्य तुमच्यासाठीच आहे. सत्ता तुमच्यासाठीच पाहिजे आहे. शहराचे सगळे प्रश्न सोडवणार. मुख्यमंत्र्यांशी समांतर पाणी योजनेवर बोलणे झाले आहे. जे शक्य आहे ते सगळे करणार. कारण हे शहर माझे आहे. इथे आल्याशिवाय निवडणुका आहेत असे वाटतच नाही. संभाजीनगरकरांचा आशीर्वाद घेतल्यावर यश हमखास मिळते म्हणजे मिळतेच. मैदानावर जमलेली गर्दी पाहून भगवा डौलाने फडकणार याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही असे उद्धव ठाकरे म्हणताच उपस्थितांनी टाळय़ांचा कडकडाट केला.

हर्षवर्धन जाधव यांची हकालपट्टी
चंद्रकांत खैरे हे भगव्याचे शिलेदार आहेत. त्यांच्या विरोधात उभे राहून अपशकून करणाऱयांना माफी नाही असे ठणकावून सांगत उद्धव ठाकरे यांनी आमदार हर्षवर्धन जाधव यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे जाहीर करताच टाळय़ांच्या कडकडाटाने मैदान दुमदुमून गेले. अशा गद्दारांना पाठिंबा देणाऱयांचे हिंदुत्वही थोतांड आहे. अशा बेगडी हिंदुत्वाचा मुखवटा घालून गद्दारीचे विष पेरणाऱयांनी गाठ शिवसेनेशी आहे हे लक्षात ठेवावे असा सणसणीत इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.

होय, मोदींना पाठिंबा दिला
देव, देश आणि धर्मासाठी आम्ही युती केली. नरेंद्र मोदी हेच आमचे पंतप्रधान आहेत. मी घेतलेला युतीचा निर्णय तुम्हाला पटला की नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर गर्दीतून होय, असे जोरदार उत्तर मिळाले. आम्ही जे काही बोललो ते उघड उघड. अनेक वर्षांनंतर दिल्लीवर भगवा फडकला आहे. मोदी नको, मग दुसरे कोण ते तर सांगा. पण यांच्याकडे औषधालाही माणूस नाही.  आमच्या जाहीरनाम्यात राम मंदिराचे निर्माण करण्याचे वचन दिले आहे. सोनिया, राहुल होमहवन करतात, पण काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ‘राम’ कुठे आहे असा रोकडा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, महायुतीचे उमेदवार शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, सुहास दाशरथे,  शिवाजी चोथे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख आमदार मनिषा कायंदे, जि. प. अध्यक्षा ऍड. देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार संजय शिरसाट, संदिपान भुमरे, प्रशांत बंब, अतुल सावे, डॉ. राहुल पाटील, राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार बदामराव पंडित, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष  डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, बसवराज मंगरूळे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, अनिल मकरिये, विवेक देशपांडे, संजय केणेकर, रिपाइंचे कार्याध्यक्ष बाबुराव कदम, जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ, अरविंद अवसरमल, युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, जालन्याचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, महिला आघाडीच्या संपर्क संघटक कला ओझा, सहसंपर्क संघटक सुनीता आऊलवार, जिल्हा संघटक सुनीता देव, माजी आमदार संतोष सांबरे, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, संतोष जेजूरकर, गणेश चोपडे, कृष्णा पाटील डोणगावकर, स्थायी समिती सभापती राजू वैद्य, सभागृह नेता विकास जैन, गटनेता मकरंद कुलकर्णी, शहरप्रमुख विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, जिल्हा युवा अधिकारी ऋषिकेश खैरे, संतोष माने, गजानन बारवाल, दिलीप थोरात, प्रदीप पाटील, सुरेंद्र कुलकर्णी, बाळू गायकवाड, राजेंद्र दानवे, सचिन खैरे, ऍड. आशुतोष डंक आदींची उपस्थिती होती.

शिवसैनिक हीच माझी ताकद
शिवसेनाप्रमुखांचे कडवट शिवसैनिक हीच माझी ताकद आहे. या शक्तीचा मी कधीही गैरवापर करणार नाही असे अभिवचन देतानाच उद्धव ठाकरे यांनी मत कुणाला देणार याचा विचार करा. मला काहीही नको, मी तुमच्यासोबतच राहणार आहे. पण तुमच्या भविष्याचा विचार करणाऱया, सतत तुमच्यासोबत राहणाऱया चंद्रकांत खैरे यांच्या भाळी विजयाचा टिळा लावण्यासाठी भगव्याची लाट उसळू द्या असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले.

देशद्रोही कन्हैयाच्या विरोधात कोणी बोलत नाही
आम्हाला इशारे देणारा पंतप्रधान नको, सर्जिकल स्ट्राइक करणारा पंतप्रधान हवा असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे वाभाडे काढले. जेएनयूमध्ये देशद्रोही घोषणा देणारा कन्हैयाकुमार निवडणूक लढवतो आहे. त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. मोदी नको, मग कन्हैया हवा का? याचे उत्तर कोण देणार असे उद्धव ठाकरे म्हणाले. काँग्रेसने जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम काढून टाकण्याचे आश्वासन दिले आहे. काय भयंकर प्रकार आहे. अशाने देशद्रोही छाताडावर नाचतील असा गर्भित इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.