
सामना ऑनलाईन । कल्याण
कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा आणि पर्यायाने हिंदुत्ववादी विचारांचा बालेकिल्ला. शिवसेनेने सलग सहा वेळा या मतदारसंघावर भगवा फडकवला आहे. 1987 पासून गेली 31 वर्षे या मतदारसंघातील जनतेने सातत्याने विजयाचा कौल दिला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही युतीची भक्कम एकजूट, शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेली मॅरेथॉन विकासकामे यावरच कल्याण लोकसभेतील मतदार शिक्कामोर्तब करतील, असे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.
शिवसेनेच्या शाखांमधून वर्षाचे बाराही महिने जनतेच्या समस्यांचे सातत्याने निराकरण केले जाते. त्यामुळेच कल्याण हा शिवसेनेचा बालेकिला बनला आहे. कल्याण लोकसभेतील शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत मतदारसंघातील समस्यांचा आवाज उठवला आणि त्या सोडवण्याचे अथक प्रयत्न केले.
राष्ट्रवादीत मरगळ
राष्ट्रवादीने अखेर ठाण्याचे नगरसेवक बाबाजी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. ‘कोकण किनारा’ नावाचे हॉटेल कल्याणला असणे इतकाच काय तो बाबाजी पाटील यांचा कल्याण-डोंबिवलीशी संबंध. स्वतःला हेविवेट समजणारे जिह्यातील नेते कल्याणमध्ये फिरकतही नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीत कमालीची मरगळ आहे.
विधानसभा मतदारसंघ व आमदार
डोंबिवली – रवींद्र चव्हाण (भाजप)
कल्याण पूर्व – सुभाष भोईर (शिवसेना)
कल्याण पूर्व – गणपत गायकवाड (अपक्ष)
उल्हासनगर – ज्योती कलानी (राष्ट्रवादी)
अंबरनाथ – डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना)
कळवा – मुंब्रा – जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी)
शिवसेनेने करून दाखवले
उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा त्रास कमी व्हावा म्हणून पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू.
दिवा, ठाकुर्ली, उल्हासनगर, कळवा, कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांचा कायापालट.
प्रस्तावित ठाणे मेट्रो थेट कल्याण-डोंबिवली-बदलापूरपर्यंत
ठाणे-कल्याण जलवाहतूक अंतिम टप्प्यात
ग्रामीण भागात डांबरी-काँक्रीट रस्त्यांचे जाळे, खाडी पूल
कौसा येथे 100 खाटांचे रुग्णालय
लोकसहभागातून जलयुक्त शिवार योजनेद्वारे अंबरनाथ ग्रामीण परिसरातील पाणी समस्या संपुष्टात
1 लाख झाडांची लागवड, त्यांच्या सकस वाढीसाठी योजना
उल्हासनगरच्या कामगार रुग्णालयाचा पुनर्विकास
पासपोर्ट कार्यालय, पाइप गॅस, अंबरनाथ शिवमंदिर विकास
सिकलसेल या गंभीर आजाराचा दिव्यांगांच्या प्रवर्गात समावेश करावा यासाठी डॉ. शिंदे यांनी लोकसभेत आवाज उठवला. त्यामुळे केंद्र सरकारने या आजाराचा दिव्यांगांच्या प्रवर्गात समावेश केला. त्यामुळे या आजाराशी लढणाऱ्या रुग्णांना दिव्यांगांच्या प्रवर्गातून हक्काची नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
कल्याण लोकसभा 2014
डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना – 4, 40, 892
आनंद परांजपे, राष्ट्रवादी – 1, 90, 143
प्रमोद पाटील, मनसे – 1,22, 349
राष्ट्रवादीचे दिग्गज नॉट रिचेबल
गेल्या वेळी अडीच लाखांच्या मताधिक्याने पराभव झाल्याने आनंद परांजपे यांनी कल्याणमधून आधीच काढता पाय घेतला. माजी मंत्री गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड यांनीही बुडत्या जहाजात बसण्यास नकार दिला.




























































