मतदान लोकशाहीचा आत्मा! गायक शान यांचे मुंबईकरांना मतदानासाठी आवाहन

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिह्यातील चार मतदारसंघांसह मुंबईत सहाही मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. आपले मतदान लोकशाहीचा आत्मा आहे. प्रत्येकाने मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. या दिवशी मुंबईकरांनी शहरात थांबून जाणीवपूर्वक मतदान करावे, असे आवाहन गायक शान यांनी मुंबईकरांना केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदारांमध्ये जनजागृतीसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱया विधानसभेच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघांतर्गत मतदार जागरूकता आणि सहभाग (स्वीप) कार्यक्रमांतर्गत आज आर. व्ही. टेक्निकल स्कूल, रामकृष्ण मार्ग, खार जिमखाना येथून ‘व्होट टू व्होट रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. यात गायक शान सहभागी झाले होते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भागवत गावंडे, प्राचार्या नेहा जगतयानी उपस्थित होते. रॅलीत नॅशनल कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.