लोक न्यायालय ही लोकाभिमुख चळवळ:  जिल्हा न्यायाधीश जगताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

लोकन्यायालय ही लोकाभिमुख चळवळ आहे. त्यामुळे आर्थिक आणि वेळेची मोठी बचत होत असून दोघा पक्षकारांमधील समेटामुळे त्यांच्यात ऋणानुबंध निर्माण होतो. त्याच बरोबर भांडणात वेळ गेल्याने कुटुंबाची खुंटलेली प्रगती लोकन्यायालयातील समेटामुळे पक्षकाराला पुन्हा साधता येते. त्यामुळे लोक न्यायालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढावीत असे आवाहन जिल्हा न्यायाधीश एस.आर.जगताप यांनी केले. जिल्हा न्यायालयात जिल्हा रविवारी विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने प्रधान जिल्हा व सत्र न्यायधीश कमलाकर कोठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालत (लोकन्यायालय) चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्या. जगताप बोलत होते. या लोक अदालतचे उद्घाटन न्या. जगताप व पक्षकार सुशीला केदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायाधिश व्ही. व्ही. बांबर्डे, जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे, जिल्हा न्यायाधिश एम.व्ही.देशमुख यांच्यासह पक्षकार, वकील आणि न्यायाधीश वर्ग उपस्थित होता.

यावेळी बोलतांना न्या. जगताप म्हणाले की, “लोक न्यायालयात प्रकरणे मिटल्यास पक्षकारांमध्ये मनःशांती निर्माण होऊन तोच वेळ आणि पैसा चांगल्या कार्यासाठी खर्ची होतो. यावेळी न्या. पद्माकर केस्तीकर म्हणाले की, या वर्षातील हे पहिलेच लोकन्यायालय आहे. त्यामध्ये खटलेपुर्व प्रकरणे ५१५४ व प्रलंबित प्रकरणे १२३८२ असे एकूण १७५३६ प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. त्यात मोटर अपघात, महावितरण, लवाद दरखास्ती, दिवाणी अपिले, विशेष दिवाणी दावे, १३८ ची प्रकरणे, बँक प्रकरणे, नियमित फौजदारी प्रकरणे आणि बीएसएनएलच्या प्रकरणांचा समावेश आहे. त्यामुळे या लोकन्यायालयातून अधिकाधिक प्रकरणे निकाली निघावीत असे आवाहन त्यांनी केले.