हुश्श… सुटलो! सरावादरम्यान विराटला झालेली दुखापत गंभीर नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। साऊदम्पटन

हिंदुस्थानचा क्रिकेट संघ 5 जूनला सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. मात्र त्याआधी कर्णधार विराट कोहलीच्या बोटाला सरावादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे तमाम हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींसह संघव्यवस्थापनाची धाकधूक वाढली. मात्र ही दुखापत गंभीर नसून तो पहिल्या लढतीत खेळणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली. विराट कोहलीने रविवारी आपल्या संघसहकाऱयांसह जिममध्ये वर्कआऊट केल्याचा फोटो सोशल साईटवर टाकल्यानंतर हिंदुस्थानी चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

पहिल्या सामन्यासाठी साऊदम्पटनमध्ये दाखल झालेल्या ‘टीम इंडिया’ने तेथे शनिवारी सराव केला, मात्र सरावादरम्यान विराट कोहलीच्या अंगठय़ाला दुखापत झाली. जवळच असलेले संघाचे फिजिओ पॅट्रीक फराहत यांनी त्याच्यावर तत्काळ उपचार केले. पॅट्रीक फराहत यांनी विराटच्या अंगठय़ावर स्प्रे मारून प्राथमिक उपचार केले. त्यानंतर कोहलीने सराव अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला. दुखापत झाल्यानंतर अंगठय़ावर थंड पाण्याची पिशवी ठेवून कोहली ड्रेसिंग रूममध्ये परतला.

‘विराट कोहलीची दुखापत फारशी गंभीर नसल्यामुळे चिंता करण्याचे काही कारण नाही. कोहली बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या वर्ल्ड कप सामन्यात नक्की खेळेल. रविवारी ‘टीम इंडिया’कडून सराव करून न घेता त्यांना विश्रांती देण्यात आली होती.