
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,311 घरांसाठी 13 डिसेंबर रोजी ऑनलाईन सोडत काढण्यात येणार होती. मात्र, डिसेंबर संपत आला तरी सोडतीच्या नवीन तारखेची अद्याप घोषणा न झाल्यामुळे अर्जदारांचा हिरमोड झाला आहे. सोडतीची नवीन तारीख कधी जाहीर होणार याकडे अर्जदार डोळे लावून बसले आहेत.
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या 5311 सदनिकांकरिता 15 सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ झाला. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1010, एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1037, सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 919, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनसाठी 67 सदनिका आहेत. तसेच प्रथम येणायास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विरार बोळींज येथील 2277 घरांचा समावेश आहे. शेवटच्या घराची विक्री होईपर्यंत बोळींज येथील घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे. कोकण मंडळाच्या सोडतीसाठी 24 हजार 303 अर्ज प्राप्त झाले आहेत.
अधिवेशन असल्यामुळे प्रशासकीय कारण देत 13 डिसेंबर रोजी होणारी ऑनलाईन सोडत पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, डिसेंबर संपत आला तरी सोडतीच्या नवीन तारखेची अद्याप घोषणा झालेली नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची वेळ मिळत नसल्याने सोडत रखडल्याची चर्चा आहे. त्यामुळे सोडतीला मुहूर्त कधी मिळणार, याकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे.




























































