लोअर परळ पुलाला आता ऑक्टोबरचा मुहूर्त, काम पूर्ण करण्याची डेडलाइन पुन्हा वाढवली

 

पाच वर्षांपासून बंद असलेल्या लोअर परेलचा रेल्वे मार्गावरील पूल वाहतुकीस सुरू होण्यास आता ऑक्टोबर उजडणार आहे. रेल्वे गर्डरचे काम पूर्ण करण्यास विलंब झाल्याने पालिकेला पुलाच्या दोन्ही बाजूंचे काम पूर्ण करण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे पुलाचे काम पूर्ण करण्याची डेडलाइन आता ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. परिणामी, या मार्गाच्या प्रतीक्षेत असलेल्या वाहनधारकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

रेल्वेच्या हद्दीतील कामासाठी पश्चिम रेल्वेने 87 कोटीचे टेंडर मंजूर केले आहे. तर ऍप्रोच रोडच्या कामाचे 138 कोटींचे टेंडर काढले आहे. या पुलाचा एन.एम. जोशी मार्गाजवळील ऍप्रोच रोड जर रेल्वेने 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत आमच्या ताब्यात दिला असता तर एप्रिलपर्यंत काम पूर्ण झाले असते, असे  पालिका अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. मात्र रेल्वेकडून पुलाच्या कामाला विलंब झाल्याने ऍप्रोच रोडचे काम वेळेत पूर्ण होणार नाही. त्यामुळे पुलाचे काम पूर्ण करण्याबाबत असलेली डेडलाइन ऑक्टोबर 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच पालिका आयुक्तांनीही अर्थसंकल्पात लोअर परळ पुलाचे काम साठ टक्के पूर्ण झाले असून त्याचे संपूर्ण काम पावसाळय़ानंतर पूर्ण होणार असल्याचे पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी म्हटले आहे.

 पालिकेच्या ऑगस्ट 2022 च्या इंटर्नल अहवालात या पुलाला उशीर होण्यामागे पश्चिम रेल्वेला गर्डर टाकण्यासाठी झालेला उशीर असे म्हटले आहे. जी.के. रोडवरील सॉलीड रॅम्प आणि एन.एम. जोशी मार्गावरील उत्तर बाजूचा ऍप्रोच भाग बांधून झाला आहे. रेल्वेने रेल्वे रूळांवरील जुना साचा पाडून नवीन वेब गर्डर टाकले आहेत. पश्चिम रेल्वेने पहिला गर्डर गेल्या वर्षी जून 2022 मध्ये तर दुसरा गर्डर सप्टेंबरमध्ये लाँच केला. रेल्वेने पूर्व बाजूची ऍप्रोच लॅण्ड 4 ऑक्टोबरला पालिकेच्या ताब्यात दिली आहे. गर्डर टाकण्यासाठी ही जागा रेल्वेने आपल्या ताब्यात घेतली होती.