माँसाहेबांचा आज स्मृतिदिन

सामना प्रतिनिधी । मुंबई

तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांचा आज 22 वा स्मृतिदिन  आहे. त्यानिमित्त मुंबई येथील स्व. सौ. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समितीच्या वतीने आज सकाळपासूनच शिवतीर्थावर माँसाहेबांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 7 वाजल्यापासून ‘श्री सिद्धिविनायक सुगम संगीत’चे रविराज नर, राजा कदम, संजय परळकर, मनीषा कीर, चंद्रकांत साखरपेकर, प्रमोद परकर, सुहास जयवंत, विजय पवार, श्यामसुंदर परब आदी कलाकार भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यानंतर ताडदेव येथील श्री गणेश महिला मंडळ, दादर येथील आर्यादुर्गा भजन मंडळ आणि दैवज्ञ हितवर्धक महिला भजन मंडळ, सावंतवाडी संस्थान महिला भजन मंडळ या संस्थांच्या वतीने भजनगीतांचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती स्मारक समितीच्या वतीने देण्यात आली. खोपोली येथील रमाधाम वृद्धाश्रम येथेही माँसाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त भजन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी दिली.