आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाचा हल्ला, माढय़ातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फरार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना माढा तालुक्यातील बारलोणी गावात घडली आहे. यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल धनंजय गायकवाड, अक्षय दळवी, धनाजी गाडे अशी जखमींची नावे आहेत.

सांगोला पोलीस ठाण्यात चोरी, दरोडा, बॅग लिफ्टिंग यांसारखे गुन्हे दाखल असलेला फरार आरोपी बारलोणी गावात दडून बसल्याची माहिती ग्रामीणच्या गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथक गावामध्ये गेले असता, एका मंदिराजवळ जमावाने पोलीस पथकावर तुफान दगडफेक सुरू केली. यात तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. तोडफोडीत पोलिसांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.