मढी : कानिफनाथांच्या समाधीचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

सोमवारी राज्यासह परराज्यातून आलेल्या लाखो भाविकांनी नाथांचा जयघोष करत तालुक्यातील मढी येथील कानिफनाथांच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला.

रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथांनी मढी येथे समाधी घेतल्याने तीन टप्यात पार पडत असलेल्या मढी यात्रेचा रंगपंचमीचा दिवस महत्वाचा मानला जातो. सोमवारी सकाळ पासूनच मढीकडे जाणारे सर्व बाजूचे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. सकाळ पासून लागलेली भाविकांची रीघ सायंकाळ पर्यंतही चालूच होती. मुख्य मंदिर भाविकांच्या गर्दीने चांगलेच फुलून गेले होते. पायी येणाऱ्या व अस्तन्या घेऊन येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान समितीने स्वत्रंत दर्शनबारीची व्यवस्था केल्याने मुख्य मंदिरावर फारसा गोंधळ उडाला नाही.

चालू वर्षी अस्तन्या घेऊन येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय वाढली होती. नाशिक जिल्ह्यातून जवळपास 32 आरामगाड्या घेऊन काही भाविक अस्तन्या घेऊन आले होते. अनिरुद्ध अकेडमीच्या स्वयंसेवकांनी आलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवले. दरवर्षी प्रमाणे या वेळीही एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली होती मात्र त्या वर नियंत्रण नसल्याने या वाहतुकीचा खेळखंडोबा झाल्याने मढी ते निवडुंगे व मढी ते तिसगाव या मार्गावर अनेक ठिकाणी वाहतुक विस्कळीत झाली होती.

मढी येथे आलेले भाविक प्रसाद म्हणून रेवड्या घेतात व त्या मुख्य मंदिरावर उधळत असल्याने रेवड्याच्या बाजारात आज चांगलीच उलाढाल झाली तर मढी येथील गाढवांचा बाजार हा यात्रेचे वैशिष्ठ मानला जातो. या बाजारात गावरान व काठेवाडी मिळून जवळपास सातशे गाढवे विक्रीसाठी आली होती. गावरान गाढवांचा दर हा पाच हजार ते दहा हजार असा होता तर काठेवाडी गाढवे 12 हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत विकली गेली.

madhi