आजपासून अकरावीचे अ‍ॅडमिशन, मुंबईत प्रवेशांवर एसएससीच्या विद्यार्थ्यांचा वरचष्मा, सायन्ससाठी चुरस कमी

राज्यातील अकरावीच्या तब्बल 20 लाख जागांकरिता उद्यापासून (19 मे) केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (कॅप) सुरू होत आहे. सीबीएसई, आयसीएसईच्या तुलनेत राज्य शिक्षण मंडळाच्या (एसएससी) 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱया मुंबईकर विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 30 टक्क्यांनी वाढल्याने यंदा अकरावीच्या प्रवेशांवर एसएससीच्या विद्यार्थ्यांचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांना 10 पसंतीक्रम नोंदवायचे आहेत. त्यानंतर गुणवत्ता यादी तयार करून मग महाविद्यालयाचे वाटप केले जाईल. तसेच पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाल्यास प्रवेश घेणे अनिवार्य राहील. ही प्रवेश फेरी 12 जूनपर्यंत चालणार आहे. त्यानंतर दुसऱया फेरीकरिता रिक्त जागा जाहीर केल्या जातील.

एसएससीच्या विद्यार्थ्यांचा वरचष्मा

नुकत्याच लागलेल्या राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालात मुंबई विभागातील तब्बल 17,895 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या13,430 विद्यार्थ्यांच्या तुलनेत ही वाढ तब्बल 30टक्क्यांहून अधिक आहे. दुसरीकडे आयसीएसईच्या 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱया विद्यार्थ्यांची संख्या राज्यभरातच कमी झाली आहे. गेल्या वर्षी आयसीएसईच्या 12,216 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते. यंदा ही संख्या 12,151 वर आली आहे. तर 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱयांची संख्या 5,230 वरून 4,756वर आली आहे.

सीबीएसईची तर देशभरातच 90 टक्केवाल्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी सीबीएसईच्या दोन लाख 12 हजार विद्यार्थ्यांना हा मान मिळाला होता. यंदा ही संख्या दोन लाखांवर आली आहे. तर 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱयांची संख्या 48 हजारावरून 45,516वर आली आहे.
मुंबईत अकरावी प्रवेशाकरिता नामवंत महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्याकरिता एसएससीच्या विद्यार्थ्यांना सीबीएसई-आयसीएसईच्या विद्यार्थ्यांसोबत तगडी स्पर्धा द्यावी लागते. परंतु, दोन्ही बोर्डांच्या तुलनेत एसएससीच्या विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशांवर वरचष्मा राहण्याची शक्यता आहे.

  • ऑनलाईन नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळ – https://mahafyjcadmissions.in https://mahafyjcadmissions.in
  • प्रवेश प्रक्रियेसंदर्भात महाविद्यालयांना कोणतीही तांत्रिक अडचण अथवा मार्गदर्शनाची आवश्यकता भासल्यास, त्यांनी खालीलप्रमाणे संपर्क साधावा. हेल्पलाइन क्रमांक – 8530955564 ई-मेल ः [email protected] [email protected]

विज्ञान शाखेसाठी चुरस कमी

यातच जेईई, नीट, एमएचटी-सीईटी यांसारख्या स्पर्धा परीक्षांमुळे इंटिग्रेटेड कॉलेज-क्लासेसमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. त्यामुळे अनेक नामवंत महाविद्यालयांमधील विज्ञान शाखेकरिता असलेली प्रवेशाची स्पर्धा आधीच्या तुलनेत फारच कमी झाली आहे. मात्र कॉमर्स आणि कला शाखेतील (केवळ नामांकित महाविद्यालये) प्रवेशासाठीची चुरस कायम आहे.

कोटय़ातील प्रवेश 6 जूनपासून

जे विद्यार्थी कॅप किंवा कोटय़ामार्फत एखाद्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करतील त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असे समजले जाईल, अशी माहिती शिक्षण संचालक आणि राज्यस्तरीय प्रवेश नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. महेश पालकर यांनी दिली. नोंदणी शुल्क डिजिटल माध्यमातून स्वीकारला जाईल. व्यवस्थापन, इन-हाऊस, अल्पसंख्याक कोटय़ातील प्रवेश 6 जूनपासून सुरू होणार आहेत.

मुंबईच्या जागा दोन लाखांनी वाढल्या

गेल्या वर्षी मुंबईत अकरावीच्या अडीच लाखांच्या आसपास जागा उपलब्ध होत्या. यंदा ग्रामीण भागातील महाविद्यालयांचाही ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत समावेश करण्यात आल्याने जागांची संख्या 4 लाख 61 हजार 640 वर गेली आहे.

राज्याची प्रवेश क्षमता 20,43,254

  • विज्ञान – 8,52,206
  • वाणिज्य – 5,40,312
  • कला – 6,50,682

विभागनिहाय उपलब्ध जागा

  • अमरावती 1,86,475
  • छत्रपती संभाजीनगर 2,66,750
  • कोल्हापूर 1,93,278
  • लातूर 1,37,550
  • नागपूर 2,14,395
  • नाशिक 2,07,320
  • पुणे 3,75,846

वेळापत्रक

  • 19 आणि 20 मे – सराव सत्र
  • 21 ते 28 मे – प्रत्यक्ष नोंदणी व 10 पसंतीक्रम नोंदविणे, कोटय़ातील प्रवेशासाठी अर्ज.
  • 30 मे (सकाळी 11) – तात्पुरती गुणवत्ता यादी
  • 30 मे ते 1 जून – यादीवर हरकती व दुरुस्ती 3 जून (सायं.4) – अंतिम गुणवत्ता यादी
  • 5 जून – गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप (शून्य फेरी)
  • 6 जून (सकाळी 10) – वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी
  • 6 ते 12 जून – प्रवेश निश्चित करणे