
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डाव्होस दौऱ्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. डाव्होस दौऱ्यात तब्बल 35 ते 40 कोटींचा खर्च करण्यात आला, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्यांच्या या आरोपाला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर देत टीका केली होती. केसरकरांच्या या टीकेला शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी चोख शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. केसरकरांनी स्वत:च्या दिव्याखाली अंधार आहे, तो बघायला हवा, अशी प्रत्युत्तर दिले आहे.
दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या अनुभवाविषयी बोलताना त्यांच्या दिव्याखाली जो अंधार आहे, तो बघायला हवा होता. त्यांच्यासोबत असणाऱ्या कित्येक आमदारांची, खासदारांची मुले काय करत आहेत, ते पाहावे. ते अल्पवयात, काहीही अनुभव नसताना थेट आमदार, खासदार झाले आहेत. त्यांनी पक्षात कधीही काम केलेले नाही. तर आदित्य ठाकरे यांनी पक्षात काम केलेले आहे. आदित्य ठाकरे यांनी युवा चळवळीत काम केलेले आहे. त्यांनी युवकांचे प्रश्न सोडलवलेले आहेत, असेही सावंत यांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांनी राज्य प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी आपल्या सरकारला प्लॅस्टिक मुक्ताचा कायदा आणायला लावला होता, हे विसरून चालणार नाही. आदित्य ठाकरे यांच्याकडे असलेली प्रगल्भता ज्येष्ठ नेत्यांकडेही नाही. त्यामुळे प्रगल्भता असलेली मुलं जेव्हा पुढे येतात तेव्हा त्यांच्या पाठीशी ज्येष्ठांनी उभे राहायला हवे, असेही सावंत म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर ते देत नाहीत. याचाच अर्थात आदित्य ठाकरे यांचे नेतृत्त्व समर्थ आहे. त्यांचा अभ्यास जबरदस्त आहे. त्यांनी राज्याला एक दिशा दाखवलेली आहे. आज मुंबईचे सुशोभिकरण केले जात आहे, त्याचा पाया आदित्य ठाकरे यांनीच रचलेला आहे. कसे चांगले काम करावे, हे आदित्य ठाकरे यांनी दाखवून दिले आहे, असेही अरविंद सावंत म्हणाले. केसरकर यांनी केलेल्या टीकेला सावंत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.




























































