मेधा कुलकर्णींनी राष्ट्रवादी, मनसेची ऑफर नाकारली

534

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर होणारा विरोध आणि आमदार कुलकर्णी यांची नाराजी बघता राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेकडून त्यांना उमेदवारीची ऑफर दिली. आमदार कुलकर्णी यांच्या नाराजीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. ही ऑफर नाकारून आमदार कुलकर्णी यांनी आपण भाजप आणि चंद्रकांत पाटील यांचा घराघरात जाऊन प्रचार करू अशी भूमिका स्पष्ट केल्याने या वादावर पडदा पडला.

कोथरूड विधानसभा मतदारसंघात राज्यस्तरावरील नेत्यांकडून राजकीय घडामोडी सुरू असल्याने हा मतदारसंघ आता राज्यात लक्षवेधी ठरतो आहे. मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी कापल्यानंतर गेल्या दोन दिवसांतील घडामोडी तसेच कोथरूड विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला केलेला विरोध, तसेच आमदार कुलकर्णी यांच्या पाठिंब्यासाठी सुरू झालेली मोहीम या सर्व पार्श्वभूमीवर आमदार कुलकर्णी यांनी आपली भूमिका मांडली. कुलकर्णी यांच्या नाराजीचा फायदा उठवून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेकडून प्रयत्न झाले त्याचा भंडाफोडदेखील आमदार कुलकर्णी यांनी केला.

मला उमेदवारी नाकारण्याचे कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला फोन केला. मी तेव्हा मुंबईत होते. तुमचं काम चांगलं आहे. तुम्ही पुण्यात पोहोचेपर्यंत मी तुम्हाला ‘ए’ आणि ‘बी’ फॉर्म पाठवतो असे सांगितले. परंतु मी त्यास नकार दिला. त्यानंतर मनसेने देखील उमेदवारीसाठी विचारणा केली परंतु मी भाजपची एकनिष्ठ कार्यकर्ती असून यापुढेही पक्षाचेच काम करणार आहे असे त्यांना कळविले, असे आमदार कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

उमेदवारी कुणाला द्यायची हा पक्षाचा अधिकार आहे. परंतु हा निर्णय मला कळवण्यात आला नाही. त्याचं साधं सौजन्यदेखील न दाखवल्याबद्दल आमदार कुलकर्णी यावेळी भावुक झाल्या. बुधवारी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱया भाजप मेळाव्याच्या निमंत्रणाबद्दल विचारले असता मेधा कुलकर्णी म्हणाल्या, मला या मेळाव्याचे निमंत्रण नसले तरी मी पक्षाची सदस्य आहे. त्यामुळे मेळाव्याला उपस्थित असेन. हे सांगताना त्यांना चेहऱयावर नाराजी लपवता आली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या