‘ते’ थोरात तर आम्ही जोरात, काँग्रेस-राष्ट्रवादीचे बारा वाजवणारच; उद्धव ठाकरेंनी तोफ डागली

4318

स्वत:ला वीर बाजीप्रभूंची उपमा देणाऱ्या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चागलेच झोडपून काढले आहे. नवले यांच्या प्रचारासभेसाठी संगमनेरमध्ये दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांनी सभेत बोलाताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टिका केली. ‘ते’ थोरात तर आम्ही जोरात असे म्हणत त्यांनी संगमनेरसह संपूर्ण नगर जिल्हा भगवा करणारच असा विश्वास बोलून दाखवला.

काही दिवसांपूर्वी थोरात यांनी स्वत:ला बाजीप्रभू देशपांडे यांची उपमा दिली होती. त्यावर उद्धव ठाकरे आजच्या सभेत कडाडले. कुणाला कोणती उपमा द्यायची त्यासाठी आपण तितके समर्थ असायला पाहिजे असे ते म्हणाले. वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवरायांसाठी, प्राणांची बाजी लावली होती म्हणून ते बाजीप्रभू. राजे गडावर पोहचल्यावर त्यांनी आपले प्राण सोडले. त्यांच्याशी तुम्ही स्वत:ची तुलना कशी करता. निवडणुकीच्या तोंडावर यांना वीर बाजीप्रमू आठवले. थोरातांच्या करामती साऱ्यांनाच माहीत आहे, असं म्हणतानाच ते म्हणाले की त्यांना नाही अब्रू तर मी बोलायला कशाला घाबरू, असे म्हणताच सभास्थळी हशा पिकला. ‘तुमचा नेता बँकॉकला पोहचला आहे, तेव्हा आता तुम्ही निर्धास्त घरी जा’, असे म्हणत त्यांनी काँग्रेस नेते थोरात यांना सणसणीत टोला हाणला.

भाजप संपणार असं लोकसभे आधी वातावरण निर्माण केलं जात होतं. मात्र आम्ही भगव्यासाठी त्यांच्या सोबत उभे राहिलो आणि आपलं मजबूत सरकार पुन्हा केंद्रात आणलं, असेही ते म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीत 200 च्या पुढे जागा मिळवणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महायुतीच्या सभांना गर्दी जमतेच मात्र त्यासोबतच जनतेने निर्णय घेतला आहे, महायुती म्हणजे महायुतीलाच निवडून देणार, असेही ते म्हणाले.

संगमनेरमध्ये आपल्या सरकारचं प्रतिबिंब दिसायला पाहिजे. पण त्यासाठी आधी पाणी इथे आणू. त्यात फक्त सरकारचं नाही तर विकासाचं प्रतिबिंब दाखवायचे आहे, असे त्यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

यासभेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. आमच्यात मधल्याकाळात थोडंफार इकडे-तिकडे झालं असेपण आम्ही सोबतच राहिलो. हिंदुत्वासाठी-भगव्यासाठी आम्ही एकत्र राहिलो. 60 वर्षांत जे काँग्रेस करू शकली नाही ते आपल्या युती सरकारने 5 वर्षांत केलं, असं म्हणत त्यांनी सरकारच्या कामांसाठी पाठ थोपटली.

सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानांचा उल्लेख करत ते खाऊन थकले आहेत. त्यामुळे आता त्यांना घरी बसायचीच वेळ आली आहे. पाच वर्ष युतीच्या काळाच चांगली कामं झाली, नवीन कामं आम्ही केली.तुम्हाला 60 वर्ष दिल्यानंतर महाराष्ट्र तडफडत असेल तर तुम्हाला कोण मत देईल, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला.

कांग्रेस राष्ट्रवादीचे नेते बेरोजगार झाल्यानंतर त्यांना भूमीपुत्राींची आठवण झाली. त्यांना आता बेकारी काय असते ते कळले. पण खऱ्या बेरोजगारांना रोजगाराची संधी युती सरकार देत आहे.

तसेच गोरगरीबाला 10 रुपयात जेवण, आरोग्य चाचणी 1 रुपयात करून देण्यासारख्या सोई देणार आहोत, फक्त त्यासाठी तुमचे आशीर्वाद सिवसेना-भाजप महायुतीला हवे असल्याचेही ते म्हणाले.

तुम्ही एकत्र येणार तर तुमचा नेता कोण असणार ते आधी ठरवा. विदेशी असल्याचा मुद्दा समोर आणल्याने शरद पवारांना गेट आऊट म्हटले होते, त्यांच्यासोबत तुम्ही जाणार का? असा टोला देखील त्यांनी हाणला.

मी त्या शिवसैनिकांची माफी मागतो

ज्या जागा मी भाजपला सोडल्या, त्या जागी मेहनत घेणाऱ्या शिवसैनिकांची मी माफी मागतो. मीच तो निर्णय घेतला आहे. पण मी तोंड लपवणार नाही. कमळ – धनुष्य एकत्र आहे. आपण हिंदुत्वासाठी एकत्र आहोत. त्यामुळे महायुतीसाठी आपल्याला काम करायचे असल्याचेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या