
बेळगावात ‘कन्नड रक्षण वेदिका’च्या गुंडांनी घातलेल्या हैदोसाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. कोल्हापुरातील शिवसैनिकांनी कानडी पोलिसांचा प्रचंड फौजफाटा भेदत थेट बेळगावच्या सीमेवर धडक दिली. बेळगावात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह शिवसैनिकांना ताब्यात घेतले. दरम्यान, कर्नाटक सरकारच्या धमकीला घाबरून बेळगावचा दौरा रद्द करणारे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्याविरुद्धही शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. पळपुटेपणा दाखवून दिल्याने या मंत्र्यांना प्रतीकात्मक बांगडय़ांचा आहेर देऊन निषेध केला आहे.
सीमाभागात सध्या तणाव वाढला आहे. कानडी गुंडांच्या दहशत माजविण्याच्या प्रयत्नाला सडेतोड उत्तर देण्यासाठी कोल्हापुरातील संतप्त शिवसैनिकांनी थेट बेळगावमध्येच घुसण्याचा प्रयत्न केला. कर्नाटक पोलिसांचे कडे तोडून कोगनोळी टोल नाक्यावरून कर्नाटकात प्रवेश करताना पोलिसांनी विजय देवणे, संजय पवार यांच्यासह शिवसैनिकांना ताब्यात घेतले. यावेळी ‘बेळगाव, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये चांगलीच झटापट झाली. महाराष्ट्र पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन गोकुळ शिरगाव येथे सोडून दिले.
राज्य सरकारने बेळगावच्या मराठी भाषिकांना धीर देण्याची गरज असताना, दोन मंत्र्यांनी पळपुटेपणाची भूमिका घेऊन बेळगाव दौरा रद्द केला. त्यातच कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली. चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या मंत्र्यांनी पळपुटेपणा केल्याची टीका जिल्हामुख विजय देवणे यांनी केली. ‘‘याप्रकरणी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करून दोन्ही राज्यांच्या सीमाभागातील नागरिकांसह सौंदत्ती यात्रेकरूंच्या सुरक्षेचा विचार करावा,’’ असे ठणकावीत, बेळगावमध्ये गनिमी काव्याने घुसणारच, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनीही भाजपच्या धोरणावर कडाडून टीका केली. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अपमान होत आहे. तसेच कर्नाटकात मराठी बांधवांवरही अन्याय, अत्याचार आणि अवमान होत आहे. मात्र, महाराष्ट्रातील हे सरकार खुर्चीला लाथ मारायला तयार नसल्याची टीकाही पवार यांनी केली.




























































