आगरी मटण, मालवणी मसाला, नागपुरी भात, पुणेरी मिसळ; ठाणेकरांच्या जिभेवर ‘चव महाराष्ट्रा’ची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, ठाणे

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा… अशा शब्दांत महाराष्ट्राची महती गायिली आहे. गड- किल्ल्यांबरोबरच खाद्य व वेशभूषा संस्कृती हेदेखील महाराष्ट्राचे वैशिष्टय़ असून पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ अशा विविध भागांतील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी ठाणेकरांना मिळत आहे. महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्ताने छत्रपती महाराज मैदानावर अवघी खाद्यसंस्कृती अवतरली असून आगरी मटण, मालवणी मसाला, नागपुरी भात, पुणेरी मिसळ अशी रेलचेल आहे.

शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख व सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी आयोजित केलेल्या या महोत्सवाचे ढोलताशांच्या गजरात शानदार उद्घाटन झाले. या महोत्सवात लावणी, पथनाटय़देखील सादर करण्यात आले. विविध जिह्यांमधील खाद्यपदार्थांबरोबरच लाकडी खेळणी, मसाले, नऊवारी साडी, धोतर, पैठणी, गोधडी, कोल्हापुरी चप्पल, वारली पेंटिंग या वस्तूही खरेदी करण्याची संधी मिळत आहे. चवदार पदार्थांवर ताव मारतानाच त्या भागातील अवघी संस्कृतीच येथे अवतरली असून या महोत्सवास मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे व संदीप कुलकर्णी यांच्यासह अनेक कलाकारांनी महोत्सवाला भेट दिली.

‘चव महाराष्ट्रा’ची या उपक्रमाचे उद्घाटन महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, नगरसेविका नंदिनी विचारे, जयश्री फाटक, नगरसेवक सुधीर कोकाटे, पवन कदम, विभागप्रमुख दीपक म्हस्के, उपविभागप्रमुख राजेश तावडे, शाखाप्रमुख सतीश पवार, सचिन भोसले, ‘क्रिएटिव्ह हूक’च्या संचालिका रंजना प्रभूखानोलकर आदी उपस्थित होते. हा महोत्सव 30 जानेवारीपर्यंत चालणार असून दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत ठाणेकरांनी या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजक नरेश म्हस्के यांनी केले आहे.