बढत्या-बदल्यांचा खेळखंडोबा; पोलिसांमध्ये प्रचंड अस्वस्थता, राज्य शासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

मिंधे सरकारच्या भोंगळ कारभाराचा पोलीस दलाला नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. सहाय्यक आयुक्तपदासाठी पात्र पोलीस निरीक्षकांच्या बढतीचे आदेशच गृह खाते काढत नसल्याने अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. राज्य सरकारला आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार आहे की नाही, असा सवाल पोलीस अधिकारी विचारत आहेत.

मिंधे सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या आणि बदल्यादेखील बराच काळ रखडवून ठेवल्या होत्या. मग रखडलेल्या त्या  बढत्या आणि बदल्या सवडीनुसार जारी केल्या होत्या. आता एसीपी ते उपनिरीक्षक पदापर्यंतच्या बढत्या आणि बदल्यांचा प्रश्न गेल्या कित्येक दिवसांपासून रेंगाळत ठेवला  आहे. राज्यातील पोलीस निरीक्षक हे एसीपीसाठी पात्र असतानाही गृह विभाग त्यांच्या बढत्यांचे आदेश काढत नाही. परिणामी आज होईल, उद्या होईल अशा आशेवर अधिकारी येणारा दिवस काढत आहेत. तर बऱ्याच पात्र निरीक्षकांवर गृह खात्याच्या वेळकाढू कारभारामुळे एसीपी न बनताच निवृत्त होण्याची वेळ आली असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

एसीपीचे आदेश निघत नसल्याने बाकीचे लटकले

उपनिरीक्षक हे सहाय्यक निरीक्षक, तर सहाय्यक निरीक्षक हे निरीक्षकपदी बढती मिळण्याच्या गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षेत आहेत. आज नाही तर उद्या शासनाला जाग येईल आणि आमच्याकडे बघायला त्यांना वेळ मिळेल असेच अधिकारी म्हणत आहेत. जोपर्यंत एसीपीपदाच्या बढतीचे आदेश निघत नाही तोपर्यंत उर्वरित अधिकाऱ्यांना बढती मिळणार नसल्याने पोलीस दलातून प्रचंड रोष व्यक्त होत आहे.

250 सहाय्यक निरीक्षकांची बढती लटकली

102 बॅचच्या अर्ध्याअधिक सहाय्यक निरीक्षकांना निरीक्षकपदी बढती मिळाली आहे, तर याच बॅचच्या 250 अधिकाऱ्यांची बढती लटकली आहे. दोन महिन्यांपूर्वी या अधिकाऱ्यांच्या बढतीला कोर्टाकडून स्टे देण्यात आला होता, मात्र तो स्टे नंतर उठविण्यात आला. त्याला दोन महिने झाले तरी निरीक्षकपदी त्यांना बढती देण्यात आलेली नाही. जोपर्यंत एसीपींच्या बढतीचे आदेश निघत नाही तोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागणार नाही, असे ते अधिकारी सांगतात.

विनंत्या बदल्यांची बोंबाबोंब

राज्यातील अनेक अधिकाऱ्यांनी अन्यत्र बदलीसाठी विनंती अर्ज केले आहेत. त्या अधिकाऱ्यांचा विहित कालावधी पूर्ण झाला असल्याने ते बदलीसाठी पात्रदेखील आहेत, मात्र प्रशासनाला याकडे बघायला वेळच मिळत नसल्याने विनंती बदल्यादेखील रखडल्या  असल्याने अधिकाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

बदल्या होऊनही सोडेनात

विहित कालावधी पूर्ण झालेल्या असंख्य निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या डिसेंबर महिन्यात बदल्यांचे आदेश जारी झाले होते, पण काही मोजके अधिकारी वगळता उर्वरित अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडलेच जात नसल्याने  संबंधित अधिकारी प्रचंड नाराज झाले आहेत. आता अंत पाहू नका आणि बदलीच्या ठिकाणी सोडा, अशी आर्जव ते करीत आहेत.