महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला मिळाले आयएसओ मानांकन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगणकीकरणाच्या माध्यमातून आपल्या कामकाजात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱया आणि राज्यभरातील औद्योगिक आस्थापनांना दर्जेदार सेवा देणाऱया महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला ‘आयएसओ 9000ः2015’ मानांकन मिळाले आहे.

राज्यातील औद्योगिक आस्थापनांना सुलभ आणि तत्काळ सेवा मिळावी म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बहुतांश कामकाज ऑनलाइन पद्धतीने केले जाते. याची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मंडळाने आपली कामकाज पद्धत ‘आयएसओ’कडे सादर केला होती. त्यानुसार ‘आयएसओ’ने त्याची तपासणी करून ‘आयएसओ 9000ः2015’ मानांकन दिले आहे. ‘आयएसओ’कडून मिळालेल्या या मानांकनामुळे भविष्यात मंडळाच्या सेवा आणखी गतिमान करणे शक्य होणार आहे. सदर मानांकन मिळवण्याकरिता मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे तांत्रिक सचिव पुंडलिक मिराशे, सांख्यिकी अधिकारी दिनेश सोनावणे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

डाटा सेंटरची सुरक्षा आणि कार्यप्रणालीस स्वतंत्र मानांकन

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून संगणकीकरणाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱया विविध सेवांसाठी मंडळाकडून तांत्रिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण असे डाटा सेंटर चालवले जाते. या डाटा सेंटरची सुरक्षा आणि राज्यभरातील मंडळाच्या विविध समायोजित कार्यप्रणालीस स्वतंत्रपणे ‘आयएसओ 27001ः13’ या मानांकनाने प्रमाणित केले आहे.