रेमडेसिवीर, लस पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील जनतेसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचा योग्य पुरवठा आणि रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार ग्लोबल टेंडर काढणार आहे. ग्लोबल टेंडर काढण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अजित पवार म्हणाले, कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेता महाराष्ट्रात सुरू असलेले लसीकरण अधिक गतीने व्हावे हा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्यांवर जबाबदारी दिली आहे. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती बनवत आहोत.

ग्लोबल टेंडर काढण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन आणि लसींचा विचार करण्यात येत आहे. या टेंडरमध्ये सर्व कंपन्यांच्या लसींना परवानगी देण्यात येत आहे. लस सिरमची असो की भारत बायोटेक किंवा फायझरची अशा सर्व लसींचा ग्लोबल टेंडरमध्ये उल्लेख असणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोफत लसीबाबत 1 मे रोजी निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 1 मे पासून अर्थात महाराष्ट्रदिनापासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्याच्या तयारीत आहेत. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लसबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील असेही अजित पवार यांनी या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.

बंद ऑक्सिजन प्लांट सुरू करणार

महाराष्ट्रातील काही बंद पडलेले ऑक्सिजनचे प्लांट आम्ही सुरु करत आहोत. यांपैकी काही प्लांट वीजेअभावी, तर काही आर्थिक स्थितीमुळे बंद होते. ते आता सुरु होतील. तशा सूचना यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. साखर कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असेही पवार म्हणाले.