एमटीडीसी घडवणार टूर गाईड! 14 प्रसिद्ध पर्यटन स्थळी राबवणार प्रशिक्षण उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या गावचे किल्ले, डोंगरदऱया, मंदिरे, एखादे ऐतिहासिक संग्रहालय किंवा सामाजिक, सांस्कृतिक, नैसर्गिक वरदान लाभलेल्या स्थळाची माहिती सांगताना आपण थकत नसाल तर याच आवडीला करिअरमध्ये रूपांतरित करण्याची संधी महाराष्ट्र पर्यटन संचालनालय देणार आहे.

स्थानिक प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटकांसाठी टूर गाईडची व्यवस्था करून या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या दुहेरी हेतूने राज्यातील तब्बल 14 प्रसिद्ध पर्यटन स्थळी ट्रव्हल गाईड प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये रायगड जिह्यातील श्रीवर्धन, अलिबाग, मुरुड तसेच फलटण, मुरबाड, भंडारदरा, जुन्नर, सिंधुदुर्ग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, संभाजीनगर, रत्नागिरी, लोणार, नगर, नाशिक शहर या ठिकाणांचा समावेश असणार आहे. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम व ट्रव्हल मॅनेजमेंट ग्वालियर तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ञ प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतील. इच्छुकांना महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर 31 डिसेंबरपूर्वी अर्ज करता येतील.