रेयांश बनेची सोनेरी हॅटट्रिक, राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत पटकावली तीन सुवर्ण

नवव्या अखिल हिंदुस्थानी रोलर स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राचा युवा खेळाडू रेयांश बनेने सुवर्ण पदकांची हॅटट्रिक करत महाराष्ट्राची शान वाढवली आहे.

कोलकात्याच्या रवींद्र सरोवर लेक येथे पार पडलेली स्पर्धा रोडलॅप, 100 मी. , 500 मी. अशा तीन टप्प्यांत आयोजित  करण्यात आली होती. या तिन्ही प्रकारात रेयांश बनेने 8 ते 10 वयोगटातून महाराष्ट्राचे नेतृत्व केले. या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातून रेयांश बने याची निवड झाली होती. रेयांशने स्पर्धेच्या तिन्ही गटात आपल्या रोड स्केटिंगचा जलवा दाखवत तिन्ही स्पर्धांत सोनेरी यश संपादले. रेयांशने गोवा, म्हैसूर आणि केरळपाठोपाठ कोलकात्यातही महाराष्ट्राच्या रोलर स्केटिंगचे नेतृत्व करत अनोखा चौकार लगावला.

रेयांश हा महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण बने तसेच सचिव माजी आमदार डॉ. सुभाष बने यांचा नातू असून तो ऐरोली येथील युरो स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याने वयाच्या पाचव्या वर्षी महाराष्ट्रातील बेळगाव येथे सतत 96 तास स्केटिंग करून आपले नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले होते. त्याने आतापर्यंत विविध स्केटिंग स्पर्धांमध्ये 33 सुवर्ण 12 रौप्य आणि 8 कांस्य पदके पटकावली आहेत. रेयांश हा भांडुपचे शिवसेना युवानेते पराग बने आणि पराग इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका पृथा बने यांचा चिरंजीव आहे.