‘रोहयो’च्या 64 हजार 23 कोटींच्या आराखडय़ाला मान्यता, नगर जिल्ह्यात 29 हजार 237 विहिरींसाठी 1169 कोटी प्रस्तावित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात ‘महात्मा गांधी रोजगार हमी योजने’च्या 2023-24 या आर्थिक वर्षातील समृद्धी आराखडय़ाला मान्यता मिळाली आहे. यंदाच्या ‘रोहयो’च्या समृद्ध आराखडय़ात ‘कुटुंब लखपती तर गाव समृद्ध’ ही संकल्पना मांडण्यात आली असून, यासाठी विक्रमी 64 हजार 23 कोटी 97 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखडय़ानुसार नगर जिल्ह्यात सिंचन विहिरींसाठी एक हजार 169 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले असून, यातून 29 हजार 237 विहिरींसाठी प्रत्येकी चार लाख याप्रमाणे तरतूद करण्यात आलेली आहे.

रोजगार हमीच्या समृद्ध आराखडय़ात अनेक नावीन्यपूर्ण कामे घेण्यात आली असून, यात बायोगॅस, फूलबाग लागवड, सामुदायिक जमिनीचे सपाटीकरण यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. या योजनांसह पारंपरिक रस्ता मुरुमीकरण, पेव्हिंग ब्लॉक रस्ता, ग्रामसंघ इमारत, बचत गटांसाठी इमारत, सार्वजनिक जागेवरील गोदाम, शाळा, अंगणवाडीकडे जाणारा रस्ता, खेळाचे मैदान, शालेय स्वयंपाकगृह, शालेय संरक्षक भिंत, अंगणवाडी बांधकाम, शैचालय, अंगणवाडी, शाळा बांधकामे, बचत गट भवन, सिमेंटचे रस्ते, मल्टी युनिट शौचालय आणि स्वच्छतागृह आदी 108 प्रकारांतील कामे प्रस्तावित आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झेडपीच्या रोहयो विभागाने हा आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ात 13 कोटी 27 लाख मनुष्य दिनाची निर्मिती करण्यात आली आहे.

रोजगार हमी योजनेतून मोठय़ा प्रमाणात सिंचन विहिरींची कामे करता येणार असून, यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळण्यासोबत शाश्वत शेतीसाठी पाण्याची व्यवस्था होणार आहे. रोहयोतील विहिरींसाठी पूर्वी तीन लाख रुपयांचे अनुदान होते. मात्र, नोव्हेंबर 2022पासून हे अनुदान चार लाख रुपये करण्यात आले आहे. या योजनेसाठी लाभार्थी हा अल्पभूधारक (ओपन) आणि एससी-एसटी कॅटेगरीतील असावा. रोहयोतून बांधण्यात येणाऱया विहिरींचे अनुदान हे कुशल
आणि अकुशल स्वरूपात राहणार आहे. यात 40 टक्के अनुदान हे अकुशल कामासाठी आणि 60 टक्के अनुदान हे कुशल कामासाठी देण्यात येणार आहे.

तालुकानिहाय प्रस्तावित विहिरी

अकोले सात हजार 322, जामखेड सात हजार 378, कर्जत तीन हजार 160, कोपरगाव 433, नगर दोन हजार 725, नेवासा दोन हजार 360, पारनेर एक हजार 107, पाथर्डी एक हजार 816, राहाता 40, राहुरी 105, संगमनेर 391, शेवगाव दोन हजार 130, श्रीगोंदा 210 आणि श्रीरामपूर 50 यांचा समावेश आहे.

–.