
मुंबई महाराष्ट्राची राजनाधी असली तरी सहजासहजी मिळाली नाही. अनेकांचे बलिदान त्याच्यामागे आहे. यानंतर मुंबईचे मराठीपण आणि मुंबईचा मानसन्मान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे कायम राहिला. शिवसेनेमुळेच मुंबई टिकली, असे गौरवोद्गार विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काढले. तर आपल्या विषयी प्रसारमाध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या गैरसमजांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
मागीला काळात विधान परिषद किंवा पोटनिवडणुका आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे सरकार निवडणुका घ्यायला घाबरत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. करायचे काही नाही, नुसता बोभाटा करण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. त्यासाठी जनतेच्या घामाच्या पैशाचे कोटय़वधी रुपये जाहिरातबाजीवर उडवले जात आहेत. केल्या जाणाऱ्या जाहिरातीत मराठी, महाराष्ट्राचा अवमान केला जात असल्याचे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या ‘देखो महाराष्ट्र’ जाहिरातीचा दाखला देत स्पष्ट केले. यांना आता खरा महाराष्ट्र दाखवण्याची वेळा आल्याचेही त्यांनी सांगितले. आघाडी सरकार पाडण्यासाठी फडणवीसांसोबत 150 बैठका घेतल्याचे त्यांचे मंत्री सांगत असल्यामुळे कारस्थानाने सरकार पाडल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. सरकारची दडपशाही मोडून काढण्यासाठी एकजूट दाखवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.



























































