शिवभक्तांचा श्रावण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> धनश्री देसाई (तोडेवाले)

अहिल्याबाईं परमशिवभक्त होत्या आणि त्यांना महेश्वरच्या नर्मदेकाठी स्वयंभू शिवलिंग मिळाले होते. त्यावर त्या रोज अभिषेक करत असत. त्यांच्या शिवभक्तीच्या कथादेखील प्रसिद्ध आहेत. अहिल्याबाई नर्मदेच्या काठावरून माती गोळा करून त्याचे शिवलिंग बनवून त्यावर लिंगार्चन अभिषेक करायच्या आणि किल्ल्यावरून अभिषेकाची जागादेखील नर्मदेकडे तोंड केलेली असायची. अर्थात आजही तिथे तसाच अभिषेक होतो.

श्रावण… पवित्र मास म्हणून श्रावण महिन्याकडे बघितलं जातं. पूजापाठ, उपवास, संकल्प, भक्ती, आराधना, जप आणि तप यांनी आपंठ बुडालेला महिना श्रावण… हिंदू पंचांगानुसार हिंदू वर्ष चैत्र महिन्यापासून सुरू होतं आणि त्यानंतर 5 व्या नंबरवर येतो. श्रावण महिना आणि त्याचबरोबर सुरू होतो चातुर्मास. श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक असे विशेष महत्त्व असणारे चार महिने म्हणजेच चातुर्मास. असं म्हणतात, सात्त्विक भक्तीकडे सुरुवात करायची असेल तर श्रावणापासून संकल्प घ्यावा. तसं तर या जगाचा खरा कारभार सांभाळणारे श्रीविष्णू नारायण आणि प्रत्येक रूपात आपल्याला ते बोध देत असतात. हिंदू वर्ष चैत्र महिन्यात श्रीरामरूपात, तर कार्तिक महिन्यात विष्णुरूपात आपण त्यांना शोधतो. असो, तर शिवशंकराचं महत्त्व सांगणारा हा महिना. श्रावण अर्थातच श्रवण करणे, ऐकणे, तर ऐकूया माहीत असलेल्या किंवा नसलेल्या शिवभक्तांच्या कथा…

मध्य प्रदेशात बारा ज्योतार्ंलगांपैकी दोन ज्योतिर्लिंग आहेत आणि या दोन्ही ज्योतिर्लिंगाच्या मध्ये स्थित आहे इंदूर नगरी. इंदूरवर राज्य करणारा होळकर राजवंश आणि ती होळकर राज्यकर्ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई. महाराष्ट्रातल्या चौंडी इथल्या मालोजी शिंदे यांच्या कुळात अहिल्याबाईंचा जन्म झाला. महाराष्ट्रातले ज्योतार्लिंग, अनेक शिवाची देवळं आणि त्यात होणारे अभिषेक आपल्याला माहीतच आहेत, परंतु मध्य प्रदेशात देवी अहिल्याबाईंच्या महेश्वरच्या मंदिरात होणाऱया शिवमहामहिम्न अर्थात लिंगार्चन अभिषेक याबद्दल आपल्याला माहीत आहे का?

2009 मध्ये ‘स्टार माझा’मध्ये असताना स्टोरीज करायला मी महेश्वरला गेले होते आणि प्रत्यक्ष लिंगार्चन अभिषेक करण्याचे भाग्य मला लाभले. आमच्या घरी लघुरुद्र, दैवे…सगळंच बाबांना तोंडपाठ होते आणि ते वेळोवेळी बाबा करत असायचे, पण महेश्वरला ते निर्मळ वास्तूत ऐकलेले वेदमंत्र आजही माझ्या कानांत ऐकू येतात आणि तो अभिषेकही आठवतो. अशा शांत वातावरणात देवी अहिल्याबाईंच्या सान्निध्यात आल्यासारखे भासते. खिडकीतून स्फटिकासारखी स्वच्छ आणि खळखळ वाहणारी नर्मदामाई जणू अभिषेक होत असताना आपली उपस्थिती सांगत असते.

मराठय़ांचा कारभार सांभाळणाऱ्या आणि मराठी शासक म्हणून देवी अहिल्याबाई यांची कीर्ती हिंदुस्थानभर होतीच. अत्यंत न्यायप्रिय असणारी राज्यकर्ती म्हणून आणि दानपुण्य करण्यात त्यांचा हात पकडणारे कुणीच नव्हते. म्हणून ‘पुण्यश्लोक’ हा अहिल्याबाईंना मिळालेला मान आहे.

अहिल्याबाईं परमशिवभक्त होत्या आणि त्यांना महेश्वरच्या नर्मदेकाठी स्वयंभू शिवलिंग मिळाले होते. त्यावर त्या रोज अभिषेक करत असत. त्यांच्या शिवभक्तीच्या कथादेखील प्रसिद्ध आहेत. अहिल्याबाई नर्मदेच्या काठावरून माती गोळा करून त्याचे शिवलिंग बनवून त्यावर लिंगार्चन अभिषेक करायच्या आणि किल्ल्यावरून अभिषेकाची जागादेखील नर्मदेकडे तोंड केलेली असायची. अर्थात आजही तिथे तसाच अभिषेक होतो. काळानुसार थोडाफार बदल झालेला असणार. 108 पाट मांडले जायचे आणि प्रत्येक पाटावर 1100 शिवलिंग असायचे. म्हणजे एकूण 1 लाख 18 हजार 800 शिवलिंगांवर अभिषेक व्हायचा. अभिषेक पात्रंही गौमुखी, नंदीमुखी, मृगमुखी, शंखमुखी असलेली असायची आणि अभिषेक झाल्यावर शिवलिंगांची माती पुन्हा नर्मदेत जाऊन मिसळून जायची. अशी उत्कृष्ट व्यवस्था होती बांधकामाची. अभिषेक होणाऱया स्थानाच्या खिडकीतून अफाट नर्मदा दिसते. प्रत्येक पाटावर मांडलेल्या 1100 शिवलिंगांची मांडणी पण अशी असते की, वरून बघितले तर संपूर्ण 1100 शिवलिंग मिळून एक मोठे शिवलिंगाचे चित्र तयार होते.

प्रत्येक शिवलिंगावर अखंड तांदळाचा दाणा लावला जातो आणि पिंडीला सजवले जाते. हिंदुस्थानात अहिल्याबाईंनी धर्मशाळा, घाट, देऊळ तितकेच योजनाबद्धरीत्या बांधलेले आहेत. आता तितके पाट मांडले जात नाहीत, पण वारसा मात्र जपला आहे. अजूनही जितके आणि जसे जमतेय, लोक ती परंपरा जपण्याचा प्रयत्न नक्की करत आहेत. मामाचं घर मंडलेश्वर, महेश्वरपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर. त्यामुळे नर्मदामाई व महेश्वर याचं आणि आमचा ऋणानुबंधच आहे.

नर्मदामाईनंच आम्हा इंदूरकरांना पोसलंय आणि अहिल्याबाईंच्या पुण्याईनं आम्ही सुखी, समृद्ध इंदुरात जन्मलो. इतिहासाच्या पाऊलखुणा सारख्या खुणावतात आणि आम्हाला सतत त्यांची आठवण करून देतात. तर अशा पावन श्रावण महिन्याचा निरोप घेत असताना शेवटल्या सोमवारी परमशिवभक्त पुण्यश्लोक माता अहिल्याबाईंच्या महेश्वरला होणारा हा शिवमहामहिम्न अभिषेक तुम्हाला सांगावासा वाटला. महाराष्ट्राबाहेर मराठीची शान वाढवणाऱया आणि मराठमोळी संस्कृती जपणाऱया अशा माता अहिल्याबाईंना नमन असो.
ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय नर्मदे हर ।

[email protected]