जम्मू-कश्मीर सीमेवर स्फोटात पुण्यातील मेजर शशीधरन नायर शहीद

40

सामना प्रतिनिधी । पुणे

जम्मू-कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकड्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात मेजर शशिधरण विजय नायर आणि जवान जीवन गुरुंग हे शहीद झाले. वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी शहीद झालेले मेजर नायर हे पुण्यातील खडकवासला येथील आहेत. मेजर नायर शहीद झाल्याची बातमी कळताच खडकवासला — किरकटवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. पुण्यात राहणाऱया नायर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या, रविवारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

मेजर नायर यांच्या पश्चात पत्नी तृप्ती, आई लता आणि बहीण सीना असा परिवार आहे. नायर कुटुंबीय मूळचे केरळचे. मेजर नायर यांचे वडील खडकवासला येथील केंद्रीय जलसंशोधन संस्थेत नोकरीला होते. दहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. मेजर नायर यांचा जन्म पुण्यातला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण खडकवासला येथील केंद्रीय विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. पदवीनंतर मेजर नायर यांनी डेहराडून येथिल इंडियन मिलिटरी ऍकॅडमीत प्रवेश घेतला. गेली 11 वर्षे ते लष्करी सेवेत होते. मेजर विजय नायर यांचा संगणक अभियंता असलेल्या तृप्ती यांच्याशी तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दीड महिन्यांपूर्वीच ते खडकवासला येथे घरी सुट्टीवर आले होते. 3 जानेवारीला सुट्टीचा कालावधी संपवून ते पुन्हा आपल्या पदावर रुजू झाले होते.

कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू- कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात हिंदुस्थानी जवानांनी आज एका चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. कुलगाममधील काटापोरा भागात संध्याकाळी लष्कर आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली.

– अत्यंत धाडसी आणि मनमिळावू स्वभावाचे अधिकारी असलेले मेजर शशिधरन नायर यांनी शुक्रवारी सकाळी घरी फोन केला होता. कुटुंबीयांशी त्यांचे बोलणे झाले होते, मात्र जम्मू-कश्मीरच्या राजौरी जिह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी रेंजर्स आणि दहशतवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडी स्फोटात मेजर नायर यांच्यासह दोन जवान गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

– उपचार सुरू असतानाच सायंकाळी मेजर नायर आणि जवान रायफलमॅन जीवन गुरुंग यांना वीरमरण आले. मेजर नायर शहीद झाल्याचे वृत्त सायंकाळी समजले.

आपली प्रतिक्रिया द्या