मलेशियात फार्म हाऊसवर दरड कोसळली; 2 ठार, 51 बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मलेशियामध्ये शुक्रवारी पहाटे एका शिबिराच्या ठिकाणी दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आणि 50 हून अधिक जण मलब्याखाली अडकलेले आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आलं.

राजधानी क्वालालंपूरच्या बाहेरील सेलांगोर राज्यात स्थानिक वेळेनुसार पहाटे 3 वाजता ही दरड कोसळळी. राज्याच्या अग्निशमन आणि बचाव विभागाच्या निवेदनानुसार रस्त्याच्या कडेला असलेले कॅम्पिंग सुविधा देणारे फार्महाऊस या दुर्घटनेमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. आता पर्यंत बचाव पथकाकडून 23 जणांना वाचवण्यात आलं आहे. मात्र, अजूनही 50 हून जास्त लोक बेपत्ता असून ते मलब्याखाली दबले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही दरड तब्बल 100 फूट उंचीवरून कोसळली आहे. त्यामुळे मलब्याखाली दबलेल्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जखमी असण्याची शक्यता आहे. बाहेर काढलेल्या लोकांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.