मालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल

406

देवबाग संगम येथील कर्ली खाडीपात्रात नौकाविहार करत असताना गुरुवारी दुपारी प्रवासी नौका उलटून माया आनंद माने या पर्यटक महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी माने यांचे नातेवाईक समिंद शांताराम गोखले यांनी नाविक आणि मालकाविरोधात दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात दोघांविरोधात (अज्ञात) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘सोबा’ या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग किनारपट्टी वादळी वाऱ्यांचे जोर वाढला होता. त्यातच गुरुवारी दुपारी देवबाग येथे नौका विहार करत असताना नऊ पर्यटकाना सफर घडविणारी नौका उलटल्याची घटना घडली. यात लिज्जत पापड समूहात अधिकारी पदावर असलेल्या माया आनंद माने यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. तर तीन वर्षीय अनया अमित अडसूळ (बदलापूर) या मुलीची प्रकृती गंभीर बनली होती.

या घटनेबाबत मयत माया शिंदे यांच्या नातेवाईकांनी शुक्रवारी मालवण गाठत पोलीस ठाण्यात नौका मालक व नाविक विरोधात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत तक्रार दाखल केली. हयगयीने नौका चालविणे तसेच पर्यटकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुभाष शिवगण, डी. व्ही.जानकर हे अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या