यात्रोत्सवात प्रवासी घटले, तरीही एसटीचे उत्पन्न वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रोत्सव काळात जादा बस फेऱ्यांच्या माध्यमातून मालवण आगाराला 11 लाख 17 हजाराचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे पाच हजार प्रवाशांची घट झाली असली तरी उत्पन्नाचा विचार करता 75 हजाराचे वाढीव उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली.

मालवण आगारातून आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी एसटी बसचे नियोजन करण्यात आले होते. आंगणेवाडी मार्गावर 24 ते 26 फेब्रुवारीपर्यंत 780 फेऱ्या सोडण्यात आल्या. यात 37 हजार 679 प्रवाशांनी लाभ घेतला. तर कुणकेश्वर मार्गावर 4 ते 6 मार्च या कालावधीत एसटीच्या 304 बस फेऱ्यातून 14 हजार 650 प्रवाशांनी प्रवास केला. गतवर्षी दोन्ही यात्रोत्सवास सुमारे 57 हजार 568 प्रवाशांनी लाभ घेतला यावर्षी मात्र पाच हजाराने घट होऊन 52 हजार 347 प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला.

आंगणेवाडीला जाण्यासाठी मालवण बसस्थानक, टोपीवाला हायस्कूल, देवबाग, वराड, तळगाव, तिरवडे, कट्टा, पोईप, खालची देवली, आंबेरी मसुरे, डांगमोडे या ठिकाणावरून बसफेऱ्या सोडण्यात आल्या होत्या.

तिकीट दराचा विचार करता आंगणेवाडी यात्रोत्सवातून मालवण आगाराला 6 लाख 67 हजार 935 रुपयाचे उत्पन्न मिळाले. तर कुणकेश्वरला जाण्यासाठी मालवण बसस्थानक, आचरा, आडबंदर, मोर्वे, मिठबाव, तांबळडेग, कातवण या मार्गावर एसटी बसचे नियोजन करण्यात आले होते. कुणकेश्वर यात्रोत्सवातून 4 लाख 49 हजार 291 रुपयाचे उत्पन्न मिळाले. याशिवाय मुंबई, पुणे मार्गावरही जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते, असे बोधे यांनी सांगितले.

आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांच्या मार्गदर्शनाखाली चालक, वाहक व मेकॅनीक, अन्य कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेऊन प्रवाशांना चांगली सेवा दिली. यात्रोत्सवात काळात चालक संतोष पाटील, रवी राणे, दीपक ढोलम यांच्यासह अन्य चालकांनी आपल्या ताब्यातील बस सजवल्या होत्या.