सलून सुरू करण्यास परवानगी मिळावी ..!  मालवणातील सलून व्यवसायिकांचे प्रशासनास निवेदन

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने नवे निर्बंध लागू केले. त्यात सलून व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले. या पार्श्वभूमीवर मालवणातील सलून व्यावसायिकांनी आपले व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवत तहसीलदार, पोलीस निरीक्षक व पालिका प्रशासनाला निवेदन देत सलून व्यवसाय, दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे.

गेल्यावर्षी लॉकडाऊन काळात शासनाच्या आदेशांचे पालन करत आम्ही आमचे व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवले. शासनाने दिलेल्या अटी-शर्थीचे वेळोवेळी पालन केले. त्यामुळे हातावर पोट असलेल्या आम्हा व्यावसायिकांचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला न्याय द्यावा. कोरोना नियमावलीचे पालन करून आम्ही व्यवसाय करू, अशी भूमिका महाराष्ट्र नाभिक महामंडळ मालवण तालुका नाभिक संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. नगरपरिषद येथे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, यतीन खोत यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

शासनाकडे निवेदन पोहचवणार!

सलून व्यावसायिकांनी केलेल्या मागणी संदर्भात आमदार वैभव नाईक यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच राज्य शासनाचे प्रतिनिधी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडेही निवेदन सादर करून सलून व्यावसायिकांच्या भावना पोहचविल्या जाणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या