पश्चिम बंगालमध्ये SIR सुरू झाल्यापासून आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा दावा, EC ला ठरवलं जबाबदार

बंगालमध्ये मतदार यादीच्या विशेष फेर तपासणी (SIR) प्रक्रया सुरू झाल्यापासून राज्याच्या विविध भागांमधून मृत्यूच्या बातम्या येत आहेत. बुधवारी सकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या X हँडलवरून निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला आहे. एसआयआर सुरू झाल्यापासून २८ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि आयोगाचा अनियोजित निर्णय यासाठी जबाबदार आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील शांती मुनी एक्का नावाच्या बूथ-लेव्हल ऑफिसरच्या (बीएलओ) आत्महत्येचा उल्लेख करून ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या एसआयआरचा तीव्र विरोध केला. त्यांनी या कारवाईमागील असह्य दबावाचा उल्लेख केला. पुढील जीवितहानी टाळण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला ही प्रक्रिया त्वरित थांबवण्याची विनंती केली आहे.

X वर पोस्ट करत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “निवडणूक आयोगाने बीएलओंवर दबाव आणला असून तीन वर्षे लागणारे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्यास सांगितले आहे.असा अमानुष दबाव कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायकच नाही तर लोकशाही प्रक्रियेसाठीही चिंताजनक आहे.”